संभाजीराजांच्या समाधीवर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी
By Admin | Updated: March 21, 2015 00:17 IST2015-03-21T00:17:44+5:302015-03-21T00:17:44+5:30
धर्मवीर श्रीछत्रपती संभाजीमहाराजांच्या ३२६ व्या बलिदान स्मरण दिनानिमित्त श्रीक्षेत्र वढू बुद्रुक येथे आज राज्यभरातून आलेल्या शंभुभक्तांनी समाधिस्थळावर पुष्पवृष्टीसाठी अलोट गर्दी केली होती.

संभाजीराजांच्या समाधीवर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी
कोरेगाव भीमा : धर्मवीर श्रीछत्रपती संभाजीमहाराजांच्या ३२६ व्या बलिदान स्मरण दिनानिमित्त श्रीक्षेत्र वढू बुद्रुक येथे आज राज्यभरातून आलेल्या शंभुभक्तांनी समाधिस्थळावर पुष्पवृष्टीसाठी अलोट गर्दी केली होती.
या वेळी हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली.
४ वढू बुद्रुक ग्रामपंचायत व धर्मवीर संभाजीमहाराज स्मृती समितीच्या वतीने झालेल्या कार्यक्रमात सकाळी शासकीय पूजा करण्यात आली. या वेळी शिरूर-हवेलीचे आमदार बाबूराव पाचर्णे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कांतिलाल उमप, तहसीलदार रघुनाथ पोटे, गटविकास अधिकारी संजय चिल्लाळ, पंचायत समिती सदस्य भगवानराव शेळके, सरपंच प्रफुल्ल शिवले, नगरसेवक महेंद्र पठारे, बाळासाहेब खैरे उपस्थित होते.
४या वेळी दरवर्षीप्रमाणे समाधिस्थळावर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी करण्यात आली. त्यानंतर पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक मनोज लोहिया यांनी दिलेल्या आदेशानुसार समाधिस्थळावर पोलिसांनी शासकीय मानवंंदना दिली. या वेळी संदीप भोंडवे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘किल्ले पुरंदर ते श्रीक्षेत्र वढू बुद्रुक-तुळापूर’ असा पालखीसोहळा वढू बुद्रुक येथे आल्यानंतर, सरपंच प्रफुल्ल शिवले व ग्रामस्थांनी पालखीचे स्वागत केले.
४पुष्पवृष्टीनंतर झालेल्या सभेस प.पू. १००८ महामंडलेश्वर शांतीगिरीमहाराज, राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळे, सुदर्शन वाहिनीचे संचालक सुरेश चव्हाणके, स्मृती समितीचे कार्यवाहक मिलिंद एकबोटे उपस्थित होते. स्मृती समितीच्या वतीने देण्यात येणारे पुरस्कार यावर्षी धर्मवीर छत्रपती श्रीसंभाजी महाराज शंभूसेवा पुरस्कार सुरेश चव्हाणके, शंभूभक्त डी. डी. भंडारे पुरस्कार बेळगाव श्रीराम सेनेचे रमाकांत कोंडुस्कर, शंभुभक्त अशोक भंडलकर पुरस्कार संतोष शिंदे, शंभुभक्त बाळासाहेब आरगडे पुरस्कार दत्ता सोनवणे, शंभुभक्त गेणू गणपत शिवले पुरस्कार वाल्मीक पोपट शिंदे व सहकारी, शंभुभक्त विवेक घाटपांडे पुरस्कार शिवप्रतिष्ठान सुरवसी (ता. फलटण, जि. सातारा), शंभुभक्त अरुण गायकवाड प्रशांत धनवडे व अक्षय दळवी (कोळशी, ता. फलटण, सातारा) यांना देण्यात आला .
४शिरूर-हवेली दिंंडीच्या वतीने तुळापूर ते वढू पालखी काढण्यात आली होती, तर तलवारबाजीचे प्रात्यक्षिकही या वेळी सादर करण्यात आले. या वेळी स्वराज्य रक्षणासाठी प्राणाची आहुती दिलेल्या २६ घराण्यांच्या वंशजांनी रक्तदान करून राजांना अभिवादन केले. शंभुछत्रपतींची पालखी व अनेक ठिकाणाहून ज्योत तसेच दिंंड्या आणण्यात आल्या होत्या. धर्मवीर संभाजीराजे युवा मंचच्या वतीने शंभुभक्तांसाठी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती. यानिमित्त रक्तदान शिबिरही घेण्यात आले.