घरातील ओल्या कचऱ्यातूनच फुलवली बाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:10 IST2021-05-07T04:10:52+5:302021-05-07T04:10:52+5:30
पुणे : सध्या कचरा ही शहराची मोठी समस्या आहे. पण जर प्रत्येक नागरिकाने घरचा कचरा घरीच जिरवला तर ही ...

घरातील ओल्या कचऱ्यातूनच फुलवली बाग
पुणे : सध्या कचरा ही शहराची मोठी समस्या आहे. पण जर प्रत्येक नागरिकाने घरचा कचरा घरीच जिरवला तर ही समस्या पटकन सुटू शकते. घरीच कचरा जिरवून त्यापासून झाडांसाठी उत्तम प्रतीचे खत तयार करता येते. ते खत कुंडीतील झाडांना देऊन सुंदर बगीचा तयार करता येऊ शकतो.
माझा कचरा ही पालिकेची जबाबदारी न राहता माझा कचरा माझी जबाबदारी यातूनच जान्हवी बापट व लोकेश बापट यांनी गेल्या काही वर्षांंपासून घरातील ओला कचऱ्याचे एक शीतदेखील बाहेर न जाता त्यापासून खत बनविले आहे. जान्हवी बापट यांनी मातीच्या मोठ्या आकाराच्या ८ कुंड्या गॅलरीत ठेवल्या. त्यात पालापाचोळा व दररोज घरामधील सर्व प्रकारचा ओला कचरा शेण, गोमूत्र, घरीच केलेले खत दर दिवशी प्रत्येक कुंडी भरेपर्यंत टाकला. असे सात दिवसांत सात कुंड्या पूर्ण झाल्यावर पहिल्या दिवशीचा कचरा आठव्या रिकाम्या कुंडीत उलट केला. मग त्या दिवशीचा ओला कचरा त्यावर भरीत पुन्हा खत टाकून ती बंद केली. असे दर दिवशी जी कुंडी रिकामी होत जाते, त्यात आधीचा कचरा कचरा भरून खत घातले गेले.
कचरा फार कोरडा वाटला तर त्यावर पाणी शिंपडीत जावे किंवा फार ओला असेल आणि वास आल्यास त्यात कोकोपीट किंवा पालापाचोळा घातला पाहिजे. कुंडीत पाणी साठणार नाही याची काळजी घेत साधारण २८ ते ३० दिवसांत जे अर्धवट खत तयार होते, ते एका मोठ्या माठात टाकून ते एखाद्या काठीने हलवून त्याचे उत्तम खत तयार होते. ह्याच सुंदर खताचा वापर करीत बापट यांनी फुलझाडे फुलवली आहे.
-------------------
माझा कचरा, माझी जबाबदारी
प्रत्येक नागरिकाला असा बगीचा फुलवता येऊ शकतो. भाजीपालादेखील लावून घरापुरती भाजी उगवता येईल. अशा प्रकारे ‘माझा कचरा माझी जबाबदारी’ म्हणून हा उपक्रम राबविण्याचे आवाहन बापट कुटुंबीयांनी केले.
----------------------