राजगडावर फुलला प्रदेशनिष्ठ वनस्पतींचा दुर्मीळ ठेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 04:08 IST2021-06-21T04:08:10+5:302021-06-21T04:08:10+5:30

श्रीकिशन काळे पुणे : स्वराज्याची पहिली राजधानी असलेल्या राजगडाच्या परिसरात सुमारे ३५० हून अधिक वनस्पतींची जैवविविधता आहे. पहिल्या पावसानंतर ...

Flower on Rajgad Keep rare of endemic plants | राजगडावर फुलला प्रदेशनिष्ठ वनस्पतींचा दुर्मीळ ठेवा

राजगडावर फुलला प्रदेशनिष्ठ वनस्पतींचा दुर्मीळ ठेवा

श्रीकिशन काळे

पुणे : स्वराज्याची पहिली राजधानी असलेल्या राजगडाच्या परिसरात सुमारे ३५० हून अधिक वनस्पतींची जैवविविधता आहे. पहिल्या पावसानंतर तर इथे अनेक दुर्मीळ, प्रदेशनिष्ठ वनस्पती फुलतात. सध्या त्यांचे दर्शन राजगडाच्या सभोवती होत असून, हा एक जैवविविधतेचा अनमोल ठेवाच आहे. अनेक वनस्पती पहिल्याच पावसात दर्शन देतात आणि नंतर पुढच्या वर्षीच्या पहिल्या पावसात फुलून येतात. त्यामुळे राजगडावर पायी जाताना हा दुर्मीळ ठेवा अनुभवणं अविस्मरणीय आहे. वनस्पती संशोधक डॉ. श्रीनाथ कवडे आणि इतिहास अभ्यास दीपक वाटेकर यांच्यासोबत या जैवविविधतेची पाहणी केली.

पावसाळा सुरू झाल्याने वृक्ष-वेलींना बहर आलेला आहे. दुर्गराज राजगड या किल्ल्याभोवती अनेक दुर्मीळ वनस्पती आहेत. त्या वनस्पतींचे दर्शन घेत खडतर पायवाटेवरून गड ‘सर’ करण्यासाठी चांगला दमसास लागतो. राजगडाच्या परिसरात अनेक प्रदेशनिष्ठ वनस्पती आहेत. ज्या फक्त त्याच ठिकाणी दिसतात. इतरत्र कुठेही नाहीत. त्यामुळे पायी चालत जाताना या आजुबाजूच्या वृक्ष-वेलींची माहिती घेत बालेकिल्ल्याकडे जायला हवे.

—————————————————

राजगड परिसरातील वनस्पती

राजगड परिसरात परीसारखी दिसणारी आम्री, कोब्रा लिली, क्रिस्टीसोनी कलकाराटा, कप-बशी, हनुमान बटाटा, होया वाघाटी, स्कार्वी, इफिजेनिया स्टेलाटा, काटे चेंडू, पिसा, रानहळद, सिल्वर फर्न, टोपली स्कार्वी, वॉकिंग फर्न, जंगली आलं आदी वनस्पतींचे दर्शन राजगडावर जाताना होत आहे, अशी माहिती डॉ. श्रीनाथ कवडे यांनी दिली.

———————————————-

प्रदेशनिष्ठ वनस्पती उंचीच्या निदर्शक

समुद्रसपाटीपासून सुमारे १३९५ मीटरवर राजगड आहे. त्यामुळे इथे अनेक वनस्पतींचा अधिवास आहे. शेषगिरीया सह्याद्रीका, कंदीलपुष्प, अबुटिलॉन रानडेई, डेल्फिनियम अशा प्रदेशनिष्ठ वनस्पती आहेत. तर काही उंचीच्या निदर्शक आहेत. कारवी ही वनस्पती खूप आहे. जमिनीला धरून ठेवण्याचे काम ही करते. हा नैसर्गिक ठेवा जपणे आवश्यक आहे, असे डॉ. कवडे यांनी सांगितले.

———————————————-

राजगड हा वनस्पती आणि प्राणी यांच्या वैविध्याने नटलेला आहे. वनस्पतींच्या दुर्मीळ आणि प्रदेशनिष्ठ वनस्पती इथे आढळतात. डेल्फिनियम मलबारिकम, रानहळद, होया, विग्ना खंडालेन्सिस, लिली, तेरडा, सोनकी, यूफोर्बिया, सेरोपेजिया, ऑर्किड आणि कारवीसह इथे ३५० च्या वर वनस्पती आहेत. फुलपाखरं, कीटक, पक्षी, उभयचर प्राणी, खेकडे, पक्षी यांचा चांगला अधिवास इथे पाहायला मिळतो. नेमास्पिस राजगडी एनसीसीसारख्या लहान पालीचा शोध अनिस परदेशी या तरुण संशोधकाला याच गडावर लागला.

- डॉ. श्रीनाथ कवडे, वनस्पती संशोधक

——————————————

Web Title: Flower on Rajgad Keep rare of endemic plants

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.