पुरामुळे दहा गावांचा संपर्क तुटला
By Admin | Updated: August 1, 2014 05:35 IST2014-08-01T05:35:38+5:302014-08-01T05:35:38+5:30
वडिवळे येथील इंद्रायणी नदीवरील पूल पाण्याखाली बुडाल्यामुळे १० गावांचा संपर्क तुटला आहे. तर नाणे रोडला विद्यावती आश्रमाजवळ पाण्याचा फुगवटा वाढल्याने येथून वाहतूक बंद आहे.

पुरामुळे दहा गावांचा संपर्क तुटला
कामशेत : वडिवळे येथील इंद्रायणी नदीवरील पूल पाण्याखाली बुडाल्यामुळे १० गावांचा संपर्क तुटला आहे. तर नाणे रोडला विद्यावती आश्रमाजवळ पाण्याचा फुगवटा वाढल्याने येथून वाहतूक बंद आहे.
वडिवळे नदीच्या पुलाची उंची कमी असल्याने येथून दरवर्षी तीन-चार दिवस गावांचा कामशेत शहराशी असणारा संबंध तुटतो. आताही खांडशी, नेसावे, वेल्हवळी, वडिवळे, खामशेत, मुंढावरे, बुथवडी, सांगिसे, उबंरवाडी, वळाक या गावांचा संपर्क तुटला आहे.
पूल बुधवारपासून पाण्याखाली आहे. त्यामुळे शाळाही बंद आहेत. शिक्षक कामावर नाहीत. कामगार, दुग्ध व्यावसायिक, विद्यार्थी, तलाठी, ग्रामसेवक असे सर्वच घरी आहेत.
पावसाचा जोर वाढल्याने अनेक ठिकाणी घरे पडली आहेत. शेताचे बांध फुटले आहेत. भातरोपे वाहून गेली आहेत. नाणे मावळातील २० गावांसह कामशेतचा विजपुरवठा खंडित आहे.
दूरध्वनी सेवा बंद आहेत. ५०० हून अधिक शासकीय दूरध्वनी बंद आहेत. वडिवळेचा पूल वाढवावा अशी मागणी माजी सरपंच प्रकाश थोरवे, भाऊ बांगर, धोंडिबा राणे, बबन जाधव आदींनी केली आहे. (वार्ताहर)