ओढ्याचे पाणी शिरले घरांत
By Admin | Updated: October 13, 2015 01:23 IST2015-10-13T01:23:55+5:302015-10-13T01:23:55+5:30
रविवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे कात्रज-कोंढवा रस्त्यावरील इरॉस पॅरामाउंट या इमारतीखालील ओढ्याला पूर येऊन अनेक घरांमध्ये पाणी शिरले.

ओढ्याचे पाणी शिरले घरांत
कात्रज : रविवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे कात्रज-कोंढवा रस्त्यावरील इरॉस पॅरामाउंट या इमारतीखालील ओढ्याला पूर येऊन अनेक घरांमध्ये पाणी शिरले. त्यामुळे नागरिकांची गैरसोय झाली. रात्र जागून काढावी लागली.
इमारत २०११ मध्ये बांधण्यात आली आहे. मात्र ती बांधत असताना पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी असलेल्या ओढ्यावर भर टाकून बांधण्यात आली. त्यामुळे पाण्याचा नैसर्गिक प्रवाह अडवला गेल्याने दरर्र्षी या इमारतीशेजारील रहिवासी भागात पाणी घरामध्ये
शिरते.
यासंदर्भात येथील नगरसेविका भारती कदम व सामाजिक कार्यकर्ते प्रकाश कदम यांनी अनेक वेळा क्षेत्रीय कार्यालय व महापालिकेस तक्रार अर्ज दिले, तर पालिका कार्यकारी अभियंत्याने या इमारतीमुळे पाणी अडणार नाही, असे लेखी पत्र प्रकाश कदम यांना दिले आहे.
रविवारी झालेल्या पावसामुळे ओढ्यातील पाण्याचा प्रवाही लोंढा ओसंडून वाहून शेजारील पवन पार्क या इमारतीच्या सीमा भिंतीवर आदळला आणि पाण्याचा लोट या इमारतीच्या बेसमेंटमध्ये घुसला. सर्व बाजूच्या भिंती तोडून पलीकडील बंगले व घरामध्येसुद्धा घुसला. घरांत पाणी शिरल्याने रहिवाशांची झोपच उडाली. सततच्या या गैरसोयीवर उपाययोजना करण्याची मागणी आता रहिवाशांनी केली आहे.
इरॉस पॅरामाउंट या इमारतीस बांधकाम परवानगी देताना या ओढ्याचा विचार महापालिका बांधकाम अधिकाऱ्यांनी का केला नाही? दरवर्षी पाणी घरामध्ये घुसत असून या बांधकाम व्यावसायिकावर कारवाई का केली जात नाही? - प्रकाश कदम,
सामाजिक कार्यकर्ते
स्थानिक नगरसेविका भारती कदम, प्रकाश कदम, स्वीकृत नगरसेवक संतोष धुमाळ, प्रतीक कदम यांनी परिसराची पाहणी करून तातडीने धनकवडी क्षेत्रीय कार्यालयाचे सहायक आयुक्त सुकुमार पाटील यांना बोलावून ओढ्याचा नैसर्गिक प्रवाह पूर्ववत करण्याच्या सूचना दिल्या. तसेच कात्रजचे तलाठी गिते यांना नुकसान झालेल्या घरांचा पंचनामा तयार करून नुकसानभरपाईसाठी अर्ज करण्यास सांगितले.