देखावे पाहण्यासाठी रस्त्यावर महापूर
By Admin | Updated: September 25, 2015 01:46 IST2015-09-25T01:46:15+5:302015-09-25T01:46:15+5:30
संपूर्ण देशाचे आकर्षण असलेल्या पुण्यातील गणेशोत्सवाला आता रंग भरू लागले असून, आरास पाहण्यासाठी गर्दीने रस्ते ओसंडून वाहू लागले आहेत़

देखावे पाहण्यासाठी रस्त्यावर महापूर
पुणे : संपूर्ण देशाचे आकर्षण असलेल्या पुण्यातील गणेशोत्सवाला आता रंग भरू लागले असून, आरास पाहण्यासाठी गर्दीने रस्ते ओसंडून वाहू लागले आहेत़ स्पिकरवरील बंधन बुधवारपासून रात्री १२ पर्यंत शिथिल करण्यात आल्याने उत्तरोत्तर भाविकांची गर्दी वाढताना दिसत होती़
बकरी ईदची शुक्रवारी आणि चौथा शनिवार अशा जोडून सुट्ट्या आल्याने त्याचा फायदा घेऊन मंडळांचे देखावे पाहण्यासाठी पुणेकर मोठ्या संख्येने गुरुवारी सायंकाळपासूनच घराबाहेर पडले होते़ रात्र जशी वाढत गेली तसे शहरातील सर्व रस्ते भरून वाहताना दिसत होते़़ वाढत्या गर्दीचा अंदाज घेऊन पोलिसांनी मध्य वस्तीतील अनेक रस्ते सायंकाळपासूनच वाहतुकीसाठी बंद केले़
आकर्षक देखाव्यांबरोबरच जिवंत देखावे सादर करण्याकडे मंडळांचा कल वाढला आहे़ त्यात प्रामुख्याने मंडळातीलच प्रमुख कार्यकर्ते विविध भूमिका साकारतात़ त्याचबरोबर एका कथेमध्ये प्रसंगांची गुंफण करून ती सादर केली जात असल्याने हे प्रसंगनाट्य पाहण्यासाठी मंडळांसमोर भाविकांची मोठी गर्दी होत असल्याचे दिसत होते़ अन्य देखावे पाहताना लोक २ ते ३ मिनिटे थांबून पुढे जात असतात़ पण, जिवंत देखाव्यामध्ये १० ते १५ मिनिटांचे संपूर्ण नाट्य असते़ तरीही संपूर्ण वेळ थांबून हे देखावे पाहत असल्याचे दिसून येत होते़ याशिवाय बंद मंडपात एनिमेटेड देखावे पाहण्यासही गर्दी झालेली दिसत होती़ त्यासाठी असे देखावे सादर करणाऱ्या मंडळांच्या बाहेर भाविकांच्या मोठ्या रांगाही दिसत होत्या़
४पोलिसांनी रस्ते वाहतुकीसाठी बंद केले असले, तरी काही वाहनचालक मधूनच घुसून आपले वाहन पुढे नेत होते़ त्यातून काही ठिकाणी वाहतूककोंडीचा अनुभवही येत होता़ देखावे पाहण्यासाठी मध्य वस्तीतील रस्त्यांवर उशिरापर्यंत गर्दी झाली होती़