शहरात पुन्हा फ्लेक्सचे ‘पीक’

By Admin | Updated: January 25, 2015 00:07 IST2015-01-25T00:07:31+5:302015-01-25T00:07:31+5:30

शहरातील अनधिकृत आणि शहर विद्रूपीकरणाच्या जाहिरातींबाबत उच्च न्यायालयाने महापालिकेचे कान टोचले असतानाही, शहरात अनधिकृत फ्लेक्सबाजीला उधाण आलेले आहे.

Flex's 'Peak' | शहरात पुन्हा फ्लेक्सचे ‘पीक’

शहरात पुन्हा फ्लेक्सचे ‘पीक’

पुणे : शहरातील अनधिकृत आणि शहर विद्रूपीकरणाच्या जाहिरातींबाबत उच्च न्यायालयाने महापालिकेचे कान टोचले असतानाही, शहरात अनधिकृत फ्लेक्सबाजीला उधाण आलेले आहे. शहरातील प्रत्येक चौकाचौकात वाढदिवस, सण, तसेच स्थानिक नेत्यांच्या चमकोगिरीचे फ्लेक्स झळकत आहेत, तर या विद्रूपीकरणाविरोधात कारवाई करण्याचे अधिकार असलेली पोलीस यंत्रणा आणि महापालिकाही हातावर हात ठेवून या प्रकारांना पाठीशी घालत असल्याचे चित्र संपूर्ण शहरात दिसून येत आहे.
प्रतिज्ञापत्राचा पालिकेला विसर
राज्यात विविध शहरांमध्ये अनधिकृत होर्डिंग आणि फ्लेक्समुळे विद्रूपीकरण होत असल्यामुळे उच्च न्यायालयाने यावर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त यांनादेखील विशेष सूचना दिल्या होत्या. महापालिकांनी यावर काय कारवाई केली, या संदर्भात प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश देण्यात आले होते. या वेळी महापालिका प्रशासनाने विविध प्रकारची कार्यवाही केली असल्याचे प्रतिज्ञापत्रामध्ये सांगण्यात आले आहे.
फ्लेक्सबाजी रोखण्यासाठी वॉर्डनिहाय नागरिकांच्या समित्या स्थापन करणे, धार्मिक तसेच वाढदिवसाचे फ्लेक्स एका दिवसापेक्षा अधिक काळ राहणार नाहीत, असेही या प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आले होते. मात्र, त्यातील एकही कारवाई प्रशासनाकडून होताना दिसत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे शहरात वाढदिवस तसेच सणसमारंभाचे फ्लेक्स आणि बोर्ड दोन-दोन आठवडे झळकत आहेत. त्यात नगरसेवक, स्थानिक कार्यकर्ते, प्रमुख राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांचे आहेत. कर्वे रस्ता, सिंहगड रस्ता, पौड रस्ता, बाणेर-बालेवाडी रस्ता, सातारा रस्ता, मध्यवर्ती पेठांमधील सर्व प्रमुख चौक तसेच पालिका भवनासमोरही फ्लेक्सची गर्दी झाल्याचे चित्र आहे. (प्रतिनिधी)

अनधिकृत फ्लेक्सबाबत तक्रार नोंदविण्यासाठी टोल फ्री (१८००२३३६६७९) क्रमांक देण्यात आला आहे. मात्र, हा टोल फ्री क्रमांक केवळ नावालाच आहे. या ठिकाणी कोणीही दूरध्वनी उचलत नाही. या शिवाय महापालिकेच्या कार्यालयीन वेळापत्रकाव्यतिरिक्त तो बंद असल्याच्याही तक्रारी पालिकेकडे करण्यात आल्या आहेत. मात्र, त्यानंतरही हा क्रमांक नावालाच आहे. याबाबत अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता, हा क्रमांक केवळ कार्यालयीन वेळेत सुरू असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे इतर दिवशी नागरिकांनी कोणाकडे तक्रार करावी, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

पदपथावर अतिक्रमण
स्थानिक नेत्यांकडूनही जाहिरातबाजी करताना, सार्वजनिक ठिकाणांवर अतिक्रमण करण्यात आले आहे. त्यात प्रामुख्याने पदपथावर बांबूचे सांगाडे लावून हे फ्लेक्स लावण्यात आले आहेत. अनेक चौकांत चक्क वाहतूक दिवे, पथदिवे झाकून फ्लेक्स लावण्यात आलेले आहेत. त्यामुळे आधीच पदपथावरील अडथळ्यांची शर्यत पार करावी लागणाऱ्या पादचाऱ्यांना आणखी एका अडथळ्याचा सामना करत पदपथ शोधावा लागत आहे.
कोट्यवधीच्या महसुलावर पाणी
चमकोगिरीसाठी फ्लेक्सला लाखो रुपये खर्च केले जातात. मात्र, महापालिकेकडे भरावा लागणारा महसूल बुडविला जात आहे. शहरातील कोणत्याही नागरिकाला, व्यक्तीला अथवा संस्था तसेच व्यावसायिक आस्थापनेला असे फ्लेक्स बोर्ड लावायचे असतील तर, त्यांनी पालिकेकडून त्या दिवसापुरते जाहिरात शुल्क घेऊन परवानगीने ते लावणे आवश्यक आहे.

Web Title: Flex's 'Peak'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.