गिरिप्रेमीच्या ‘माऊंट गंगोत्री-१’ शिखर मोहिमेला ध्वजप्रदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:24 IST2021-09-02T04:24:21+5:302021-09-02T04:24:21+5:30
पुणे : गिरिप्रेमी या अग्रगण्य गिर्यारोहण संस्थेकडून आखण्यात आलेल्या गंगोत्री-१ या ६६७२ मीटर उंचीच्या शिखरावरील महिला गिर्यारोहण मोहिमेला तिरंगा ...

गिरिप्रेमीच्या ‘माऊंट गंगोत्री-१’ शिखर मोहिमेला ध्वजप्रदान
पुणे : गिरिप्रेमी या अग्रगण्य गिर्यारोहण संस्थेकडून आखण्यात आलेल्या गंगोत्री-१ या ६६७२ मीटर उंचीच्या शिखरावरील महिला गिर्यारोहण मोहिमेला तिरंगा ध्वज देण्याचा कार्यक्रम पुण्यात पार पडला. कै. श्रीमती रमाबाई रानडे यांनी सुरू केलेल्या पुण्यातील जुन्या आणि नामांकित अशा सेवासदन संस्थेच्या शाळेमध्ये हा कार्यक्रम पार पडला.
सेवासदन इंग्रजी माध्यम शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती राधिका ओगले यांच्या हस्ते संघाला राष्ट्रध्वज देण्यात आला. गिरिप्रेमीची या मोसमातील ही सलग तिसरी मोहीम आहे. गेल्याच महिन्यात गिरिप्रेमीची महिलांची कांगयात्से १ आणि २ ही मोहीम यशस्वी झाली असून, माऊंट मंदा या अतिशय खडतर शिखरावर सध्या मोहीम सुरू आहे. गंगोत्री -१ मोहिमेचे नेतृत्व पूर्वा शिंदे-सिंग करत असून या संघात रितू चावला, सुनीता कोळके आणि स्नेहा तळवटकर या गिर्यारोहकांचा समावेश आहे. गंगोत्री-१ हे गंगोत्री शिखर समूहातील एक खडतर शिखर मानले जाते. संघाला बेस कॅम्पच्या पुढे आणखी दोन कॅम्प लावावे लागणार आहेत. वाटेतील ग्लेशियल मोरेन, टणक बर्फाची खडी चढण, हिमभेगा आणि सर्वात शेवटी माथ्याजवळ पार करावी लागणारी ९० अंश कोनातील बर्फाची भिंत या आव्हांनाना सामोरे जावे लागणार आहे. संघाची शारीरिक आणि मानसिक तयारी उत्तम झालेली असून ही आव्हाने पेलण्यास संघ सर्वतोपरी सज्ज आहे.
गिरिप्रेमीच्या संस्थापिका अध्यक्षा उषःप्रभा पागे, संस्थापक सदस्य आनंद
पाळंदे, जयंत तुळपुळे तसेच गिरिप्रेमीचे ज्येष्ठ गिर्यारोहक अजित ताटे, चंदन चव्हाण,
तर सेवासदन संस्थेचे सचिव पटवर्धन या कार्यक्रमास उपस्थित होते. “महिलांनी
देखील शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम असणं ही आज काळाची गरज
आहे. मुला-मुलींना शिक्षणाबरोबरच शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम बनविणे हे सेवासदन शाळेच्या उद्दिष्टांपैकी एक आहे आणि त्यासाठी हा ध्वजप्रदान कार्यक्रम
शाळेत होणे ही अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे.” या शब्दांत ओगले यांनी मोहिमेला
शुभेच्छा दिल्या. उषःप्रभा पागे यांनी त्यांच्या १९८१ सालच्या याच शिखरवारील प्री-
एव्हरेस्ट म्हणून आखण्यात आलेल्या मोहिमेतील बचेंद्री पाल यांच्याबरोबर केलेल्या
चढाईचे अनुभव सांगत या मोहिमेला शुभेच्छा दिल्या.
४ सप्टेंबरला संघ होणार रवाना
संघ पुण्याहून ४ सप्टेंबरला रवाना होत असून, पुणे-उत्तरकाशी-गंगोत्री
असा प्रवास करत मोहिमेची सुरुवात होईल. मोहिमेचा कालावधी अंदाजे २० - २५
दिवस इतका असणार आहे.
फोटो - गिरिप्रेमी, गंगोत्री - १,२,३