‘आरएसएस’ची आजपासून पाचदिवसीय चिंतन बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2018 00:50 IST2018-04-17T00:50:05+5:302018-04-17T00:50:05+5:30
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या केंद्रीय कार्यकारिणीची पाच दिवसीय चिंतन बैठक मंगळवारपासून मुळशी तालुक्यातील कोळवण येथे आयोजित करण्यात आली आहे. सरसंघचालक मोहन भागवत यांच्यासह सर्व वरिष्ठ पदाधिकारी बैठकीस उपस्थित राहणार आहेत.

‘आरएसएस’ची आजपासून पाचदिवसीय चिंतन बैठक
पुणे : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या केंद्रीय कार्यकारिणीची पाच दिवसीय चिंतन बैठक मंगळवारपासून मुळशी तालुक्यातील कोळवण येथे आयोजित करण्यात आली आहे. सरसंघचालक मोहन भागवत यांच्यासह सर्व वरिष्ठ पदाधिकारी बैठकीस उपस्थित राहणार आहेत. संघविस्तार, हिंदुत्व यांसह देशभरातील दलित अत्याचाराच्या घटना, आंदोलने अशा विविध मुद्द्यांवर बैठकीत विचारमंथन होणार आहे.
संघाचे अखिल भारतीय सह सरकार्यवाह मनमोहन वैद्य यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी अखिल भारतीय प्रचार प्रमुख अरूण कुमार उपस्थित होते. वैद्य म्हणाले, दि. १७ ते २१ एप्रिल या कालावधीत ही बैठक होत आहे. बैठकीमध्ये केवळ संघकार्य, विस्तार, हिंदुत्व यांंसह समाजात सध्या घडणाऱ्या घटनांबाबत चर्चा केली जाणार आहे. आगामी निवडणुकांवर कसलीही चर्चा होणार नाही. त्यामुळे राजकीय नेत्यांना बैठकीला आमंत्रित करण्यात आले नाही. सरसंघचालक या बैठकीला पूर्णवेळ उपस्थित राहणार आहेत.
दरम्यान, प्रवीण तोगडिया यांचा उमेदवार पराभूत झाल्याने त्यांनी विश्व हिंदू परिषद सोडली आहे. मात्र, तरीही संघाचा त्यांच्याशी नियमितपणे संपर्क राहील, असे वैद्य यांनी स्पष्ट केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव घेऊन काही विघटनकारी शक्ती समाजात जातीभेदाच्या भिंती उभ्या करत आहेत. डॉ. आंबेडकरांनी जातीभेद नष्ट करण्यासाठी काम केले. त्यांचे विचार भेदाची भिंत उभी करणारे नव्हते. संघही तेच करत आहे. जातीय द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न करणारे आंबेडकरांचे खरे अनुयायी असू शकत नाहीत, असेही वैद्य म्हणाले.