उद्योगनगरीत भाजप प्रथमस्थानी

By Admin | Updated: October 24, 2014 05:23 IST2014-10-24T05:23:25+5:302014-10-24T05:23:25+5:30

मोदी लाटेत सर्वाधिक खेचून शहरातील क्रमांक एकचा पक्ष म्हणून भारतीय जनता पक्षाने स्थान मिळविले आहे.

The first in the Udyogaragar BJP | उद्योगनगरीत भाजप प्रथमस्थानी

उद्योगनगरीत भाजप प्रथमस्थानी

मिलिंद कांबळे, पिंपरी
मोदी लाटेत सर्वाधिक खेचून शहरातील क्रमांक एकचा पक्ष म्हणून भारतीय जनता पक्षाने स्थान मिळविले आहे. दोन्ही खासदार पक्षाचे आणि ३८ हजार मतांची वाढ होऊनही शिवसेनेला दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले आहे. महापालिकेत सत्ता असताना आणि ४७ हजार ६६६ ने मतांत वाढ होऊनही राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्ष तिसऱ्या क्रमांकावर फेकला गेला. भारतीय रिपब्लिकन पक्षाने (आठवले गट) अनपेक्षितपणे चौथे स्थान पटकाविले.
विधानसभा निवडणुकीत पिंपरी, चिंचवड आणि भोसरी या तिन्ही मतदारसंघांत मिळवून एकूण ६ लाख ८० हजार ४२९ जणांनी मतदान केले. मोदी लाटेत भाजपला मोठा फायदा झाला. पक्षाने एकूण १ लाख ६७ हजार ४१२ मते मिळाली. झालेल्या मतांपैकी ही २४.६० टक्के मते आहेत. इतके मते घेऊनही केवळ चिंचवड या एकाच मतदारसंघामध्ये भाजपला विजय मिळविता आला. पिंपरी मतदारसंघ आरपीआयला सोडण्यात आला होता. २००९ च्या निवडणुकीत भाजप केवळ पिंपरी मतदारसंघातच लढला. तेथे ५१ हजार ५३४ मते होती.
तिन्ही मतदारसंघ हे मावळ आणि शिरूर या लोकसभा मतदारसंघांत समाविष्ट आहेत. दोन्ही खासदार शिवसेनेचे आहेत. शिवसेनेने तिन्ही ठिकाणी मिळून २३.४३ टक्के म्हणजे १ लाख ५९ हजार ४४२ मते खेचत शहरात दुसरे स्थान मिळविले. पिंपरीत भगवा फडकविण्यात पक्ष यशस्वी ठरला. इतर दोन्ही ठिकाणी पक्ष दुसऱ्या स्थानी राहिला. गेल्या २००९ मध्ये पक्षाला १ लाख २१ हजार ३६६ मते घेत शहरात प्रथमस्थानी होता. यंदा ३८ हजार ७६ मतांत वाढ होऊनही पक्षाचे स्थान घसरले.
महापालिकेत सत्ता असतानाही राष्ट्रवादी काँग्रेसला तिसऱ्या क्रमांकाची १ लाख ३५ हजार ५२५ मते मिळाली. ही १९.९१ टक्के मते आहेत. असे असतानाही पक्षाला एका ठिकाणी विजय मिळवीत आला नाही. गेल्या वेळेस पक्षाला पिंपरी आणि भोसरी असा दोन ठिकाणी एकूण ८७ हजार ८५९ मते होती.
आरपीआयने पिंपरी या एकाच मतदारसंघात ४७ हजार ७६१ मते (७.०१ टक्के) घेतली. अनपेक्षितपणे पक्षाने शहरात चौथे स्थान मिळविले. गेल्या वेळेस केवळ ११ हजार १४६ मते होती. तिन्ही ठिकाणी कॉँग्रेसला ५.०३ टक्के म्हणजे अवघी ३४ हजार २९१ मते मिळाली. शहरात पक्ष पाचव्या स्थानावर राहिला. गेल्या निवडणुकीत पक्षाने केवळ चिंचवड या एका मतदारसंघात २४ हजार ६८४ मते घेतली होती.
यंदा प्रथमच निवडणुकीत उतरलेल्या मनसेने एकूण १७ हजार ६१७ मते घेत सहावे स्थान मिळविले. बहुजन समाज पक्षाने १.४५ टक्के म्हणजे एकूण ९ हजार ८७६ मते घेत अखेरच्या सातव्या स्थानावर राहिला. गेल्या वेळेपेक्षा ही मते २ हजार ५७ ने कमी आहेत.

Web Title: The first in the Udyogaragar BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.