लठ्ठ श्वानावर भारतात पहिल्यांदाच शस्त्रक्रिया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:08 IST2021-06-18T04:08:28+5:302021-06-18T04:08:28+5:30
पुण्यातील कर्वेनगर येथील रहिवासी दारूवाला यांनी हा कुत्रा पाळला आहे. पाच वर्षांपूर्वी दीपिका ही कुत्री घरी आल्यानंतर आसपास धावत ...

लठ्ठ श्वानावर भारतात पहिल्यांदाच शस्त्रक्रिया
पुण्यातील कर्वेनगर येथील रहिवासी दारूवाला यांनी हा कुत्रा पाळला आहे. पाच वर्षांपूर्वी दीपिका ही कुत्री घरी आल्यानंतर आसपास धावत राहायची, घरातील कामामध्येही मदत करत होती. त्यानंतर तिला श्वास घेताना अडचण जाणवू लागली. ती एकाच जागी बसून राहायची. हे लक्षात आल्यानंतर त्यांनी औषधोपचार सुरू केले. दरमहा १० हजार रूपये औषधांसाठी खर्च करण्यात येत होते. परंतु, तिच्या प्रकृतीत सुधारणा होत नव्हती. त्यानंतर सोशल मीडियावरून माहिती काढून कुटुंबीयांनी पुण्यातील स्मॉल अॅनिमल क्लिनिकचे डॉ. नरेंद्र परदेशी यांची भेट घेतली. अतिरक्त वजन कमी करण्यासाठी आहारात बदल करून लेप्रोस्कोपिक स्लीव्ह गॅस्ट्रोनोमी शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. त्यानंतर डॉ. शशांक शाह यांच्याशी चर्चा करून शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला.
डॉ. शशांक शाह म्हणाले, ‘‘व्यायामाची कमतरता, खाण्यापिण्याच्या व झोपण्याच्या वेळा अनिश्चित असल्याने प्राण्यांमध्येही वजन वाढू लागले आहे. लॅब्राडोर, गोल्डन रिट्रीव्हर, बॉक्सर, सेंट बर्नार्ड या भारतीय कुत्र्यांच्या प्रजाती असून त्यांना कार्बोहायड्रेटयुक्त अन्नपदार्थ जास्त प्रमाणात दिले जातात. या कुत्र्याच्या बाबतीतही अशीच परिस्थिती होती. माणसांप्रमाणे या कुत्र्याला लठ्ठपणा, उच्च रक्तदाब, हृदयरोग, सांध्यांचे विकार होते. श्वानाचे सरासरी आयुर्मान हे १२-१५ वर्षे असते. परंतु, लठ्ठपणामुळे श्वानाचे आयुष्य सहा वर्षांनी कमी झाले आहे.’’
डॉ. नरेंद्र परदेशी म्हणाले, ‘‘६ जून रोजी श्वानाची भूल देऊन शस्त्रक्रिया करण्यात आली. साधारणतः दोन तास शस्त्रक्रिया चालली. शस्त्रक्रियेपूर्वी १२ तास श्वानाला द्रव आहाराशिवाय काहीही खायला दिले नव्हते. साधारणतः प्रत्येक श्वानाचे वजन १८-२० किलो इतके असले पाहिजे. परंतु, या श्वानाचे वजन तब्बल ५० किलो एवढे होते. शस्त्रक्रियेनंतर श्वानाला सात दिवस चिकन सूपवर देण्यात येत होते. त्यानंतर अवघ्या पाच दिवसांत श्वानाच्या वजनात पाच किलो घट झाली आहे. आता श्वानाचे वजन ४५ किलो आहे. सध्या श्वानाला व्यायामाचा सल्ला देण्यात आला आहे.''