मेट्रोचा पहिला टप्पा सुरू होणार
By Admin | Updated: September 10, 2015 04:25 IST2015-09-10T04:23:55+5:302015-09-10T04:25:07+5:30
शहरातील बहुचर्चित मेट्रोच्या पहिल्या टप्प्यातील वनाझ ते रामवाडी व स्वारगेट ते चिंचवड या मार्गांमध्ये किरकोळ बदल करून सर्वंकष विकास आराखड्याला (डीपीआर) केंद्र शासनाने

मेट्रोचा पहिला टप्पा सुरू होणार
पुणे : शहरातील बहुचर्चित मेट्रोच्या पहिल्या टप्प्यातील वनाझ ते रामवाडी व स्वारगेट ते चिंचवड या मार्गांमध्ये किरकोळ बदल करून सर्वंकष विकास आराखड्याला (डीपीआर) केंद्र शासनाने अखेर मान्यता दिली आहे. या मार्गाची टेंडर प्रक्रिया सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, महिनाभरात मेट्रोसाठी कंपनीची स्थापना होण्याची शक्यता आहे. त्यानंतर काही दिवसांतच प्रत्यक्ष कामाला
सुरुवात होईल.
पुण्यातील वाहतुकीच्या प्रश्नावर केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली दिल्ली येथे बुधवारी बैठक झाली. या वेळी पालकमंत्री गिरीश बापट यांच्या अध्यक्षतेखालील समितीने पहिल्या टप्प्यात मेट्रोच्या मार्गात येणाऱ्या अडचणी दूर करून त्याचा अहवाल राज्य शासनाला सादर केला होता. राज्य शासनाने तो केंद्राकडे सादर केला होता. या अहवालातील बदल मान्य करून मेट्रोच्या पहिल्या टप्प्यातील डीपीआरला मंजुरी देण्यात आली आहे. डीपीआरमध्ये सुचविलेल्या वनाझ ते रामवाडी मार्गामध्ये थोडासा बदल करण्यात आला आहे. पूर्वी ही मेट्रो जंगली महाराज रस्त्यावरून जाणार होती, त्याऐवजी ती आता नदीकाठाने जाईल. बाकी संपूर्ण मार्ग पूर्वीप्रमाणेच असतील.
मेट्रोचा आराखडा तयार करण्यासाठी पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेने दिल्ली मेट्रो रेल्वे कॉपोर्रेशनची (डीएमआरसी) नेमणूक केली होती. त्यांनी याचा अभ्यास करून पहिल्या टप्प्यातील वनाझ ते रामवाडी व स्वारगेट ते चिंचवड या दोन मार्गांचा डीपीआर तयार केला. हा पहिला टप्पा ३१.५० किमीचा आहे. त्या वेळी वनाझ ते रामवाडी या मार्गासाठी २ हजार ५९३ कोटी रुपये, तर स्वारगेट ते चिंचवड या मार्गासाठी ५ हजार ३९१ कोटी रुपये खर्च अपेक्षित धरण्यात आला होता.
मात्र, हा प्रकल्प २०१३मध्ये पूर्ण होईल, हे गृहीत धरून हा खर्च अपेक्षित धरण्यात आला होता, आता या प्रकल्पाला दोन ते अडीच वर्षे उशीर झाल्यामुळे या खर्चात मोठी वाढ होणार आहे. प्रकल्प खर्चात राज्य शासन व केंद्र शासन प्रत्येकी २० टक्के रकमेचा भार उचलणार आहे. तर, १० टक्के निधी महापालिका खर्च करणार आहे. उर्वरित ५० टक्के निधी कर्जाच्या स्वरूपात उभा करण्यात येणार आहे.
पहिल्या टप्प्यातील मार्गावर १५ स्थानके व एक डेपो प्रस्तावित धरण्यात आला आहे. डेपो व स्थानकासाठी १८.४४ हेक्टर जागेची आवश्यकता लागणार आहे.
पहिला टप्पा ५ वर्षांत
पूर्ण होण्याची शक्यता
मेट्रोचा पहिला टप्पा ५ वर्षांमध्ये पूर्ण होण्याचा अंदाज डीपीआरमध्ये व्यक्त करण्यात आला आहे. त्यापैकी 3 वर्षे बांधकाम पूर्ण होण्यास लागतील, अशी अपेक्षा आहे. प्रकल्प अंमलबजावणीसाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चाधिकार समिती स्थापन केली जाणार आहे. मेट्रोसाठी कंपनीच्या संचालक मंडळाची निवड होईपर्यंत पुणे महापालिका कार्यान्वयन संस्था म्हणून काम पाहणार आहे. हा प्रकल्प निकडीचा सार्वजनिक प्रकल्प म्हणून घोषित करण्यात आला आहे. बांधा, वापरा व हस्तांतरित करा किंवा सार्वजनिक-खासगी सहभाग किंवा डीएमआरसी पॅटर्न अशा पयार्यांमधून योग्य पर्याय निवडून तो पूर्ण केला जाण्याची शक्यता आहे.
अशी असेल पुणे मेट्रो
- सुमारे १९ तास म्हणजे पहाटे ५ ते रात्री १२ पर्यंत मेट्रो सुरू राहील.
- पाच ते बारा मिनिटांनी एक गाडी धावेल.
-सहा डब्यांची व चार डब्यांची, असे दोन पर्याय.
-सहा डब्यांच्या मेट्रोतून एकाच वेळी १ हजार ५७४, तर चार डब्याच्या मेट्रोतून १ हजार ३४ प्रवाशांची वाहतूक होईल.
- ताशी ३३ किलोमीटर वेग.
- स्वारगेट ते चिंचवड व वनाझ ते रामवाडी या प्रवासासाठी १७ रुपये प्रस्तावित; मात्र प्रस्ताव रखडल्याने त्यामध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता.
बैठकीतून कॉँग्रेस, शिवसेना, मनसेला गाळले
पुण्याच्या प्रश्नावर आयोजित करण्यात आलेल्या बैठकीस नितीन गडकरी यांनी शरद पवार यांना निरोप देण्याची मुत्सदेगिरी दाखविली. पवार बैठकीस उपस्थितही राहिले. त्यामुळे सर्वपक्षीय बैठकीचे नाव देण्यात आले. मात्र, कॉँग्रेस, शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांना मात्र बैठकीतून वगळण्यात आले. पुणे महपाालिकेत राष्ट्रवादी कॉंग्रेसबरोबर सत्तेत सहभागी असलेल्या कॉँग्रेसच्या कोणाही पदाधिकाऱ्याला निमंत्रण नव्हते. तर भाजपबरोबर युतीत असलेल्या शिवसेनेचाही कोणी नेता नव्हता. पुणे महापालिकेत शिवसेना, भाजपपेक्षा संख्येने जास्त असलेल्या मनसेचीही अनुपस्थिती होती.
पुण्याच्या सार्वजनिक वाहतुकीच्या दृष्टीने तर हा अत्यंत चांगला दिवस ठरला आहे. अनेक दिवसांपासून रखडलेल्या मेट्रोच्या आराखड्यास या बैठकीमध्ये मंजुरी देण्यात आली आहे. केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी मेट्रोचे काम तातडीने सुरू करण्याच्या दिशेने पावले टाकण्याचे आदेश दिले आहेत. टेंडर प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे, तसेच महिनाभरात कंपनीची स्थापना होईल.- महापौर दत्तात्रय धनकवडे