पुणे : पहिल्या टप्प्यात राज्यातील साडेआठ लाख शेतक-यांना कर्जमाफी देण्यात आली असून यासाठी सहकार विभागाच्या खात्यावर शासनाने ४ हजार कोटी रुपये १८ आॅक्टोबर रोजी जमा केले, अशी माहिती सहकार आयुक्त विजयकुमार झाडे यांनी दिली. बँकांनी शेतकºयांना हिरव्या यादीप्रमाणे थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र (बेबाकी) द्यावे तसेच कर्जमाफीच्या रकमेसाठी सहकार विभागाकडे प्रस्ताव पाठवावेत, असे आवाहनही झाडे यांनी केले आहे.जिल्हा सहकारी बँका, राष्ट्रीयीकृत आणि खासगी बँकांमध्ये राज्य शासनाच्या नावाने चालू खाते उघडण्यात आले आहे. शेतकरी कर्जमाफीची रक्कम या खात्यांवर दाखविण्यात येणार आहे. बँकांनी शेतकºयांचे कर्ज माफ करून त्यांना तसे बेबाकी प्रमाणपत्र द्यायचे आहे. त्यानंतर बँकांनी कर्जमाफी दिलेल्या शेतकºयांची यादी आणि रक्कम याचा प्रस्ताव सहकार विभागाला दिल्यानंतर बँकांच्या खात्यावर सहकार विभागाकडून पैसे जमा करण्यात येणार आहेत. पहिल्या टप्प्यात हिरव्या रंगाच्या यादीतील शेतकºयांना कर्जमाफी देण्यात आली आहे. पिवळ्या रंगाच्या यादीतील शेतकºयांच्या कागदपत्रांतील त्रुटी दूर करून त्यांना हिरव्या यादीमध्ये घेऊन दुसºया टप्प्यात त्यांना कर्जमाफी देण्यात येणार आहे. तर लाल रंगाच्या यादीतील शेतकरी पिवळ्या आणि नंतर हिरव्या यादीमध्ये घेऊन त्यांनाही कर्जमाफी दिली जाणार आहे, असेही झाडे यांनी सांगितले.
पहिल्या टप्प्यात राज्यातील साडेआठ लाख शेतक-यांच्या कर्जमाफीसाठी सहकार विभागाला चार हजार कोटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2017 05:50 IST