परीक्षा विभागाचे पहिले पाढे पंचावन्न?

By Admin | Updated: March 27, 2015 00:25 IST2015-03-27T00:25:06+5:302015-03-27T00:25:06+5:30

मूळ निकाल जाहीर झाल्यानंतरही विद्यार्थ्यांना गुणपत्रिका न मिळणे, आॅनलाईन अर्ज भरताना अडचणी येणे अशा विविध प्रश्नांना विद्यार्थ्यांना सामोरे जावे लागत आहे.

The first phase of the examination department is fifty-five? | परीक्षा विभागाचे पहिले पाढे पंचावन्न?

परीक्षा विभागाचे पहिले पाढे पंचावन्न?

पुणे : पुनर्मूल्यांकनाचा निकाल उशिरा लागणे, मूळ निकाल जाहीर झाल्यानंतरही विद्यार्थ्यांना गुणपत्रिका न मिळणे, आॅनलाईन अर्ज भरताना अडचणी येणे अशा विविध प्रश्नांना विद्यार्थ्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षा विभागाला पूर्णवेळ नियंत्रक मिळूनही विद्यार्थ्यांचे प्रश्न सुटलेले नाहीत. परिणामी विद्यापीठावर ‘पहिले पाढे पंचावन्न’ म्हणायची वेळ आहे का ? अशी चर्चा विद्यापीठ वर्तुळात सुरू झाली आहे.
गेल्या काही महिन्यांपासून विद्यापीठाचा परीक्षा विभाग चर्चेत नव्हता. परंतु, डॉ. अशोक चव्हाण यांनी परीक्षा नियंत्रकपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर काही कालावधीतच पुन्हा एकदा परीक्षा विभाग चर्चेत येईल, अशी स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा परीक्षा विभागाच्या कारभारावर ताशेरे ओढण्यापूर्वी चव्हाण यांना कामकाजात सुधारणा करणे गरजेचे झाले आहे.
अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर होऊन दोन ते अडीच महिन्यांचा कालावधी उलटून गेला असून, अनेक विद्यार्थ्यांनी उत्तरपत्रिकेच्या छायांकित प्रती (झेरॉक्स) मिळण्यासाठी अर्ज केला आहे. परंतु, अद्याप त्यांना झेरॉक्स कॉपी मिळालेल्या नाहीत. उत्तरपत्रिकांच्या झेरॉक्स मिळाल्याशिवाय पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज करता येत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. परीक्षा विभागाने उत्तरपत्रिकांच्या झेरॉक्स काढण्याचे काम आऊट सोर्स केले आहे. परंतु, काही कारणास्तव सुमारे २२ दिवस उत्तरपत्रिकांच्या झेरॉक्स काढण्याचे काम बंद ठेवले होते. परिणामी विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकांच्या प्रती वेळेत मिळू शकल्या नाहीत. त्यामुळे सर्वाधिक विद्यार्थिसंख्या असणाऱ्या अभियांत्रिकी विद्याशाखेच्या विद्यार्थ्यांना वेळेत उत्तरपत्रिका मिळणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
विद्यापीठाने काही पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे निकाल आॅनलाईन जाहीर केले आहेत. परंतु, बऱ्याच विद्यार्थ्यांना अद्याप गुणपत्रिका मिळालेल्या नाहीत. त्याचप्रमाणे फार्मसी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना आॅनलाईन अर्ज भरण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या अर्जात काही चुका होत्या. परिणामी विद्यार्थ्यांना अर्ज भरण्यास अडचणी येत आहेत, अशीही माहिती समोर येत आहे.

अभियांत्रिकी विषय वगळता बहुतांश सर्व विषयांच्या उत्तरपत्रिकांच्या छायांकित प्रती विद्यार्थ्यांना देण्यात आल्या आहेत. पुनर्मूल्यांकनाच्या निकालाची प्रक्रिया प्रगतिपथावर असून, वेळेत निकाल देण्याबाबत परीक्षा विभागातर्फे सर्वोतोपरी प्रयत्न केले जात आहेत. अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या परीक्षा येत्या ५ मे पासून सुरू होणार आहेत. त्यापूर्वी विद्यार्थ्यांना उत्तपत्रिकांची झेरॉक्स व पुनर्मूल्यांकनाचा निकाल दिला जाईल. आवश्यकता भासल्यास झेरॉक्स मशिन व परीक्षकांची नियुक्ती करण्यात येईल.
- डॉ. अशोक चव्हाण, परीक्षा नियंत्रक,
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

Web Title: The first phase of the examination department is fifty-five?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.