नारायणगावात आढळला पहिला म्युकरमायकोसिसचा रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 04:11 IST2021-05-14T04:11:44+5:302021-05-14T04:11:44+5:30
नारायणगाव : जुन्नर तालुक्यातील नारायणगाव येथे म्युकरमायकोसिस आजाराचा पहिला रुग्ण आढळून आला आहे. या महिला रुग्णाला ...

नारायणगावात आढळला पहिला म्युकरमायकोसिसचा रुग्ण
नारायणगाव : जुन्नर तालुक्यातील नारायणगाव येथे म्युकरमायकोसिस आजाराचा पहिला रुग्ण आढळून आला आहे. या महिला रुग्णाला पुढील उपचारासाठी पुण्यात पाठविण्यात आल्याची माहिती संदीप डोळे यांनी दिली.
धनगरवाडी येथील एक ६५ वर्षीय महिला पुणे येथील समर्थ हॉस्पिटल, नाना पेठ पुणे येथे गेली तीन आठवड्यांपासून कोरोना आजारावर उपचार घेत होती. त्यांना पंधरा दिवस हॉस्पिटलमध्ये व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. बरे वाटल्यानंतर रविवारी (दि.९) ह्या महिलेस रुग्णालयातून उपचार पूर्ण झाल्यानंतर सोडण्यात आले. उपचारानंतर महिला आपल्या मूळ गावी धनगरवाडी (ता. जुन्नर) येथे आली. त्यानंतर रुग्णाचा डोळा लाल झाला, सुजला, डोळ्यातून पाणी येऊ लागले, ठणक चालू झाला. डोळ्याच्या तक्रारीनंतर महिलेला नारायणगाव येथील डॉ. मनोहर डोळे मेडिकल फाउंडेशनचे अथर्व नेत्रालय येथे तपासणीसाठी आणण्यात आले. तेथील नेत्रतज्ज्ञ डॉक्टर अमित वानखेडे यांनी त्या महिला रुग्णाची डोळ्याची तपासणी केली असता त्यांना म्युकरमायकोसिस या आजाराची लक्षणे दिसून आली म्हणून महिला रुग्णाला एमआरआय करण्यास सांगितला. एमआरआयच्या रिपोर्टनुसार रुग्णास म्युकरमायकोसिस हा आजार झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर डॉ. संदीप डोळे व डॉ. अमित वानखडे यांनी रुग्णास पुणे येथे प्रथम उपचार घेतलेल्या दवाखान्यात जाण्याचा सल्ला दिला. कारण पहिले उपचार ज्या दवाखान्यात झालेले आहेत त्या डॉक्टरांना स्वतः केलेल्या उपचारासंबंधी जास्त माहिती असल्याने त्यांना त्याच दवाखान्यात पुढील उपचार घेणे सोयीस्कर होते. त्यानंतर डॉ. संदीप डोळे यांनी संबंधित रुग्णाची माहिती तालुका आरोग्य विभागाला दिली.