पहिलीपासून दहावीपर्यंत सोडला नाही पहिला नंबर
By Admin | Updated: June 18, 2014 02:19 IST2014-06-18T02:19:05+5:302014-06-18T02:19:05+5:30
क्षकांचे मार्गदर्शन आणि आई-वडिलांच्या पाठबळावर खराळवाडी येथील सर्वसामान्य कुटुंबातील आफरीन कलीम शेख हिने महापालिका शाळांतून प्रथम क्रमांक पटकाविला

पहिलीपासून दहावीपर्यंत सोडला नाही पहिला नंबर
पिंपरी : शिक्षकांचे मार्गदर्शन आणि आई-वडिलांच्या पाठबळावर खराळवाडी येथील सर्वसामान्य कुटुंबातील आफरीन कलीम शेख हिने महापालिका शाळांतून प्रथम क्रमांक पटकाविला. तिने उर्दू माध्यमातून ९४ टक्के गुण मिळविले. वर्गातील प्रथम स्थान पहिलीपासूनच अढळ ठेवत तिने दहावीतही बाजी मारली.
आकुर्डी येथील मौलाना अबुल कलाम आझाद उर्दू स्कूलची आफरीन विद्यार्थिनी आहे. दहावीत असताना पहाटे चारला तिचा दिवस सुरू होत असे. सकाळी ७ पर्यंत आणि रात्री दोन तास अभ्यास असा तिचे अभ्यासाचे वेळापत्रक होते. शाळेतील अतिरिक्त वर्गाचा तिला लाभ झाला. सकाळच्या तीन तासांच्या वर्गात तिने तुलनेने कठीण विषयाची उत्तम तयारी केली.
महापालिका शाळांतून प्रथम आल्याची बातमी शिक्षकांकडून समजताच पालकांनी फटाके फोडून आनंद साजरा केला. शास्त्र हा तिचा आवडीचा विषय असून, संशोधन क्षेत्रात करीअर करण्याचा तिचा मनोदय आहे. तसेच, प्राध्यापिका होऊन ज्ञानदानाचे काम करण्यास तिची पसंती आहे.
गोष्टीची पुस्तके वाचणे हा तिचा छंद असून, डिस्कव्हरी चॅनल ती आवडीने पाहते. टीव्हीवरील पाककृतीचे कार्यक्रम पाहून ते स्वत: बनविण्याची तिची खुबी आहे. सातवी शिष्यवृत्ती परीक्षेतही तिने प्रथम स्थान मिळविले होते. वक्तृत्व स्पर्धेत तिने दुसरा क्रमांक मिळविला होता. शालेय क्रीडा स्पर्धेतही ती उत्स्फूर्तपणे सहभागी होते. तिचे वडील कलीम यांचे खराळवाडीत केशकर्तनाचे भाड्याचे दुकान आहे. मूळचे उत्तर प्रदेशातील बहारीपूरचे (जिल्हा जौनपूर) असलेले शेख कुटुंब ३५ वर्षांपूर्वी कामधंद्याच्या शोधात शहरात आले. रस्ता रुंदीकरणात त्यांचे दुकान गेले. तरीही न खचता कलीम हे पाल्यांस शिक्षण देत आहेत. आफरीनची बहीण नर्गीस त्याच शाळेत नववीला आहे. भाऊ इरफान डॉ. डी. वाय. पाटील महाविद्यालयातून बारावी उत्तीर्ण झाला. लहान भाऊ तौफिक एच. ए. स्कूलमध्ये तिसरीला आहे.
आफरीनने असेच यश मिळवावे, ही मनापासून इच्छा होती. ती पूर्ण झाली. अल्लाने माझी दुवा कबूल केली, असे गृहिणी असलेल्या आई शहनाज यांनी अतीव आनंदाने सांगितले. आफरीन मात्र या गुणांवर समाधानी नसून, तिला ९६ ते ९८ टक्के गुणांची अपेक्षा होती. सायबर कॅफेत निकाल पाहून ती रडत होती. मात्र, नंतर स्वत:ला सावरत तिने पेढे वाटत आनंद साजरा केला.(प्रतिनिधी)