बहुली जिल्ह्यातील पहिली ‘डिजिटल’ शाळा
By Admin | Updated: September 5, 2015 03:24 IST2015-09-05T03:24:13+5:302015-09-05T03:24:13+5:30
लोकसहभाग, स्वयंसेवी संस्थांचे सहकार्य, शाळेने घेतलेले कष्ट, शालेय लेझीम पथक आणि विद्यार्थी-शिक्षक यांच्यामुळे बहुलीतील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ही

बहुली जिल्ह्यातील पहिली ‘डिजिटल’ शाळा
पुणे : लोकसहभाग, स्वयंसेवी संस्थांचे सहकार्य, शाळेने घेतलेले कष्ट, शालेय लेझीम पथक आणि विद्यार्थी-शिक्षक यांच्यामुळे बहुलीतील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ही जिल्ह्यातील तंत्रज्ञानयुक्त पहिली शाळा म्हणून नावारूपाला आली आहे.
लेझीमसाठी बक्षीस म्हणून मिळालेला ५० हजार रुपयांचा निधी शालेय विकास कामासाठी वापरण्यात आला. शालेय मंत्रिमंडळाची निवड लोकशाही गुप्त मतदान पद्घतीने दरवर्षी करण्यात येते. बहुली परिसरात वीटभट्टी व ऊस तोडणीसाठी हंगामी मजूर येतात. त्यांच्या मुलांना शिक्षणप्रकियेत सहभागी करून घेतले जाते. इतर माध्यमाच्या शाळेतील मुलांना येथे प्रवेश दिला जातो.
शाळेच्या जडणघडणीसाठी गटशिक्षणाधिकारी ज्योती परिहार, केंद्र प्रमुख प्रणयकुमार पवार, मुख्याध्यापक सोमनाथ म्हेत्रे व सहशिक्षक अर्चना दळवी, किरण काळे, ज्ञानेश्वर वाघमारे, पाटील बबन गायकवाड, सरपंच बंडोबा पिसाळ, दत्तात्रय भगत, बापूसाहेब दिसले, अंकुश कांबळे, रावसाहेब गायकवाड, बाळासाहेब गायकवाड, दीपक मानकर, गणपत भगत, नंदकुमार घाटे, राजेंद्र भगत, बबन भगत, शिवाजी किर्वे, चंद्रकांत किर्वे, खंडू भगत आदींनी सहकार्य केले.
शाळेला एप्रिल २०१४मध्ये आयएसओचा बहुमान मिळाला. मुख्याध्यापक सोमनाथ म्हेत्रे यांनी ग्रामस्थांना डिजिटल स्कूल ही संकल्पना समजावून सांगितली. ग्रामस्थांनी मंदिर जीर्णोद्धारासाठी जमा केलेला ५ लाख रुपयांचा निधी शाळेला दिला. तसेच शैक्षणिक दर्जा बरोबरच शाळेचा भौतिक दर्जाही सुधारला. शुक्राचार्य वांजळे यांनी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून वर्ग खोल्या, किचन शेड, टॉयलेट्स, मैदान, आवार भिंत यासाठी निधी उपलब्ध करून दिला. तसेच रोटरी क्लब परिवर्तन प्रतिष्ठान, बहुली ग्रामपंचायत व काही दानशूर व्यक्ती यांच्याकडून खेळणी, फर्निचर, लॅपटॉप आदींसाठी निधी गोळा केला.
डिजिटल स्कूल संकल्पनेमध्ये ई-लर्निंग प्रोजेक्टर, स्मार्ट बोर्ड, सुसज्ज वातानुकूलित संगणक कक्ष, मुलांसाठी टॅब, आकर्षक सौर तारांगण तयार करण्यात आले आहे. ग्रामस्थांच्या सहकार्याने सजावट, तरंगते वाचनालय, सीसीटीव्ही कॅमेरे, अत्याधुनिक प्रयोगशाळा, आकर्षक बाग, सोलर लॅब आदी सुविधा उपलब्ध झाल्या आहेत.