‘अनलॉक’च्या पहिल्याच दिवशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:13 IST2021-06-09T04:13:01+5:302021-06-09T04:13:01+5:30
खरेदीसाठी रस्त्यांवर गर्दी, नियमांना हरताळ फासत सोशल डिस्टन्सचा फज्जा बारामती :अनलॉकच्या पहिल्या दिवशी बारामतीकर कोरोनाला विसरल्याचे चित्र ...

‘अनलॉक’च्या पहिल्याच दिवशी
खरेदीसाठी रस्त्यांवर गर्दी, नियमांना हरताळ फासत सोशल डिस्टन्सचा फज्जा
बारामती :अनलॉकच्या पहिल्या दिवशी बारामतीकर कोरोनाला विसरल्याचे चित्र मंगळवारी (दि. ८) दिसून आले. विविध खरेदीसाठी रस्त्यांवर मोठी गर्दी केली होती. या वेळी शासनाच्या नियमांना हरताळ फासत अनेक ठिकाणी सोशल डिस्टन्सचा फज्जा उडविण्यात बारामतीकर आघाडीवर होते.
शहरातील कोरोनाबाधितांचा आलेख घसरत आहे. या पार्श्वभूमीवर जवळपास ६२ दिवसांनी बारामतीची सर्व बाजारपेठ आजपासून खुली झाली. यामध्ये सर्व दुकानांना सकाळी ९ ते १ अशी वेळ, तर अत्यावश्यक दुकाने ४ वाजेपर्यंत खुली ठेवण्याची मुभा शासनाने दिली आहे. मात्र, आज दुकाने उघडण्याचा शेवटचा दिवस असल्याप्रमाणे बारामतीकर रस्त्यावर उतरले. त्यामुळे बारामतीकर कोरोनाला विसरल्याची शंका निर्माण झाली आहे.
अनलॉकच्या पहिल्या दिवशी खरेदीसाठी नागरिकांची मोठी झुंबड उडाली होती. या वेळी नागरिकांनी शासनाचे नियम अक्षरश: पायदळी तुडविले. शहरातील कोरोनाबधितांची संख्या सोमवारी आठ होती. मंगळवारी रुग्णांची संख्या ५० वर पोहोचली. यामध्ये शहरातील १६ आणि ग्रामीणमधील ३४ रुग्णांचा समावेश आहे. ही आकडेवारी बारामतीकरांना वास्तव जाणीव करून देण्यासाठी पुरेशी आहे. मात्र, कोरोनाकडे दुर्लक्ष करणे महागात पडणार आहे. अत्यावश्यक कामासाठीच बाहेर पडण्याची गरज आहे.
कपडे अंडरगारमेंट, चपला दुकान, सराफ दुकान येथे खरेदीसाठी मोठी गर्दी केली होती. शेतीशी निगडित शेती औजारे, बी-बियाणे, शेतीपंप दुरुस्ती करणाऱ्या व्यावसायिकांना ४ वाजेपर्यंत वेळ वाढवून दिली आहे. गर्दीमुळे आज दुपारी एक वाजल्यानंतर देखील काही दुकाने सुरूच होती.