पहिला कोरोना रुग्ण ‘यांनी’ तपासला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2020 04:09 IST2020-12-09T04:09:20+5:302020-12-09T04:09:20+5:30
लोकमत न्युज नेटवर्क पुणे : होळीच्या दिवशी (९ मार्च) नायडू रुग्णालयातील डॉक्टरांनी परदेशातून आलेल्या काही प्रवाशांची नियमितपणे तपासणी करून ...

पहिला कोरोना रुग्ण ‘यांनी’ तपासला
लोकमत न्युज नेटवर्क
पुणे : होळीच्या दिवशी (९ मार्च) नायडू रुग्णालयातील डॉक्टरांनी परदेशातून आलेल्या काही प्रवाशांची नियमितपणे तपासणी करून दाखल करून घेतले. नेहमीप्रमाणे काम आटोपून ते घरी गेले. रात्री एका सहकाऱ्याचा फोन आला. रुग्णांची नावे घेत त्यांनी दोघांचा अहवाल ‘पॉझिटिव्ह’ आल्याचे सांगितले. डॉक्टरांच्या काळजाचा ठोका चुकला. घरातील लोकही हादरले...हा दिवस ते आज नऊ महिन्यांपर्यंत हे डॉक्टर एकदाही ‘पॉझिटिव्ह’ आले नाहीत.
परदेशातून महाराष्ट्रात येणाऱ्या प्रवाशांची चाचणी मुंबईसह पुण्यात नायडू रुग्णालयात सुरू होती. सर्वांचा अहवाल ‘निगेटिव्ह’ येत असल्याने नियमित तपासणी करणारे डॉक्टर व इतर कर्मचारीही निर्धास्त होते.
डॉ. अरविंद परमार (वय ५८) व डॉ. डी. भार्तन (वय ६२) यांना ३० जानेवारीपासून नायडूमध्ये ड्युटी लावण्यात आली होती. त्यांना स्वाईन फ्लुच्या काळात कामाचाही अनुभव आहे. दोघांनाही मधुमेह व उच्च रक्तदाबाचा त्रास असूनही त्यांनी मोठ्या हिंमतीने ही जबाबदारी स्वीकारली. परदेशातून येणाऱ्या प्रत्येकाची तपासणी ते करत होते. दि. ९ मार्चलाही नेहमीप्रमाणे आलेल्या रुग्णांची तपासणी करण्यात आली. रोजचे काम उरकून ते घरी गेले. डॉ. परमार यांना त्यांच्या एका सहकाऱ्याचा फोन आला.
दुबईतून आलेले पती-पत्नी बाधित असल्याचे त्यांनी सांगताच परमार यांच्यासह घरातील लोकही घाबरून गेले. सुरूवातीचे काही दिवस सर्वच जण तणावात होते. रुग्णालयातही त्यानंतर आलेला प्रत्येक रुग्णाविषयी मनात भिती होती. पण हळुहळू रुग्णसंख्या वाढत गेल्यानंतर ही भिती कमी होत गेल्याचे परमार यांनी सांगितले.
------------
स्वत: एकदाही केली नाही चाचणी
आत्तापर्यंत तब्बल १० ते १२ हजार रुग्णांची कोरोना तपाणी केलेल्या नायडू रुग्णालयातील डॉ. अरविंद परमार यांनी ‘त्या’ पहिल्या पेशंटनंतर आजवर भीती न बाळगता काम केले. पण त्यांनी स्वत: एकदाही कोरोना चाचणी केलेली नाही. “हा कोरोना काळ माझ्यासाठी जणू टर्निंग पॉईंट ठरला. अनेक वर्ष रुग्णसेवा केली. पण या काळात केलेल्या कामाचा अभिमान वाटतोय,” अशी भावना डॉ. परमार व्यक्त करतात.
---