पुणे: श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे आयोजित राष्ट्रीय गणेशोत्सव स्पर्धेत पुणे शहर महापालिका क्षेत्र विभागात नाना पेठेतील काळभैरवनाथ तरुण मंडळाने प्रथम क्रमांक पटकावला आहे. तर सिटी पोस्ट चौकातील महाराष्ट्र तरुण मंडळाने द्वितीय, कॅम्पमधील श्रीकृष्ण तरुण मंडळाने तृतीय, गुरुवार पेठेतील वीर शिवराय मित्र मंडळाने चौथे तर नारायण पेठेतील संयुक्त प्रसाद मित्र मंडळाने पाचव्या क्रमांकाचे पारितोषिक पटकावले आहे. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे यांनी ही घोषणा पत्रकार परिषदेत केली. स्पर्धेत १५६ मंडळांपैकी ९८ मंडळांनी पारितोषिके मिळवली असून ट्रस्टच्या वतीने १२ लाख ६ हजार रुपयांची बक्षिसे देण्यात येणार आहेत. स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ मंगळवार दि. २० ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजता गणेश कला क्रीडा मंच, स्वारगेट येथे होणार आहे. कार्यक्रमाला पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, महापौर मुक्ता टिळक, माजी आमदार उल्हास पवार, अंकुश काकडे, अखिल मंडई मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात आदी उपस्थित राहणार आहेत.गोडसे म्हणाले, राष्ट्रीय गणेशोत्सव स्पर्धेत काळभैरवनाथ तरुण मंडळाने प्लास्टिक प्रदूषणाचा धोका, अणू युध्दापेक्षा मोठा, महाराष्ट्र तरुण मंडळाने शिवबांच्या अदालातील दूध भेसळखोर, श्रीकृष्ण तरुण मंडळाने १९७१ ची युद्धभूमी, वीर शिवराय मित्र मंडळाने वाहतूक समस्या पुण्याची व जगाची आणि संयुक्त प्रसाद मित्र मंडळाने टाकाऊ संगणकीय कचऱ्यापासून श्री मूर्ती असे देखावे सादर केले होते.
राष्ट्रीय गणेशोत्सव स्पर्धेत काळभैरवनाथ तरुण मंडळाला प्रथम पारितोषिक
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2019 14:07 IST