मोशीत दत्ता फुगे यांच्या जावयावर गोळीबार
By Admin | Updated: March 16, 2015 04:27 IST2015-03-16T04:27:30+5:302015-03-16T04:27:30+5:30
रस्त्यात मोटार थांबवून लघुशंकेसाठी उभ्या असलेल्या शिवा गोविंद बोऱ्हाडे (वय २७, रा. बोऱ्हाडेवाडी, मोशी) यांच्यावर दुचाकीवरून आलेल्या दोघांनी

मोशीत दत्ता फुगे यांच्या जावयावर गोळीबार
पिंपरी : रस्त्यात मोटार थांबवून लघुशंकेसाठी उभ्या असलेल्या शिवा गोविंद बोऱ्हाडे (वय २७, रा. बोऱ्हाडेवाडी, मोशी) यांच्यावर दुचाकीवरून आलेल्या दोघांनी मारहाण करून गोळीबार केला. त्यात एक गोळी बोऱ्हाडेंच्या डाव्या हाताच्या दंडाला चाटून गेली आहे. जखमीवर उपचार सुरू आहेत. रविवारी रात्री आठच्या सुमारास मोशीतील जय गणेश साम्राज्य चौैकाजवळ ही घटना घडली. जखमी तरुण गोल्डमॅन दत्ता फुगे यांचा जावई आहे.
चिट फंडामुळे गोल्डमॅन दत्ता फुगे अडचणीत आले आहेत. गुंतवणुकीवर जादा परतावा देण्याचे आमिष दाखवून फसवणूक केल्याप्रकरणी गोल्डमॅनसह तिघा जणांवर खडकीत शनिवारी गुन्हा दाखल झाला. त्यानंतर रविवारी सायंकाळी जावयावर हल्ला झाला. मोशी प्राधिकरणातील जय गणेश साम्राज्य चौैकाकडून दगडखाणीकडे जात असताना लघुशंकेसाठी बोऱ्हाडे उभे होते. दरम्यान, दुचाकीवरून आलेल्या दोघांनी सुरुवातीला त्यांना लाकडी दांडक्याने मारहाण केली. त्यानंतर गोळीबार केला आणि हल्लेखोर पसार झाले.
बोऱ्हाडे यांना जखमी अवस्थेत पाहून मोठ्या प्रमाणावर नागरिकांची गर्दी झाली. नागरिकांनी जखमी अवस्थेतील बोऱ्हाडे यांना चिखली स्पाईन रोडवरील एका खासगी रुग्णालयात दाखल केले. या ठिकाणी उपचारानंतर पुढील उपचारासाठी पुण्यात हलविण्यात आले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांचा फौैजफाटा घटनास्थळी दाखल झाला. उपायुक्त राजेंद्र माने यांनी घटनेचा आढावा घेतला. (प्रतिनिधी)