इस्टेट एजंटवर धायरीत गोळीबार

By Admin | Updated: May 26, 2015 01:16 IST2015-05-26T01:16:50+5:302015-05-26T01:16:50+5:30

पत्नीसह पान टपरीवर पान खाण्यासाठी आलेल्या इस्टेट एजंटवर भररस्त्यात प्राणघातक हल्ला करण्यात आला.

Firing of an estate agent | इस्टेट एजंटवर धायरीत गोळीबार

इस्टेट एजंटवर धायरीत गोळीबार

पुणे : पत्नीसह पान टपरीवर पान खाण्यासाठी आलेल्या इस्टेट एजंटवर भररस्त्यात प्राणघातक हल्ला करण्यात आला. जीव वाचवण्यासाठी एका हॉटेलमध्ये लपलेल्या या इस्टेट एजंटवर हॉटेलमध्ये घुसून सपासप वार करीत गोळीबारही करण्यात आला. ही घटना रविवारी रात्री साडेदहाच्या सुमारास धायरीमध्ये घडली. गेल्या काही दिवसांत सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न बिकट बनला आहे.
हसन अब्दुल जमीर शेख (वय ३२, रा. रायकरनगर, धायरी) असे जखमीचे नाव आहे. याप्रकरणी त्यांची पत्नी रेश्मा (वय ३०, रा. धायरी) यांनी फिर्याद दिली आहे. शेख यांचा जमीन खरेदी-विक्रीचा व्यवसाय आहे. त्यांच्यावर पूर्वीचे काही गुन्हेही दाखल आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेख आणि त्यांची पत्नी रविवारी रात्री पान खाण्यासाठी मोटारीमधून वडगाव धायरी येथील मुक्ताई गार्डनजवळील पानटपरीवर आले होते. त्यांची पत्नी गाडीमध्ये बसलेली होती; तर शेख पान घेण्यासाठी खाली उतरले होते. पान घेऊन मोटारीच्या मागील बाजूस मित्रांसोबत गप्पा मारत उभे असतानाच सहा तरुण धारदार हत्यारे घेऊन
तेथे आले.
त्यांनी शेख यांच्यावर हल्ला चढवला. स्वत:चा जीव वाचवण्यासाठी शेख जवळच असलेल्या हॉटेलमध्ये पळाले. हॉटेलच्या किचनमध्ये पळालेले शेख किचनला दुसरा रस्ता नसल्यामुळे अडकून पडले. त्यांच्या पाठोपाठ आलेल्या हल्लेखोरांनी शेख यांच्यावर धारदार हत्यारांनी हल्ला चढवला. त्यांच्यावर सपासप वार करून गोळीबार करण्यात आला.
रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या शेख यांना एरंडवण्यातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.
घटनेची माहिती मिळताच रात्र गस्तीवर असलेले उपायुक्त पी. आर. पाटील, उपायुक्त डॉ. सुधाकर पठारे यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. गुन्हे शाखा आणि स्थानिक पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. हा हल्ला जमीन खरेदी-विक्रीच्या व्यवहारामधील वर्चस्वाच्या वादामधून झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. (प्रतिनिधी)

२ गोळ्या झाडल्या
४ शेख यांच्यावर दोन गोळ्या झाडण्यात आल्या असून, यातील एका गोळीची पुंगळी पोलिसांना किचनमध्ये मिळून आली. दरम्यान, हॉटेलमधील आचारीही या हल्ल्यामध्ये जखमी झाला आहे.

Web Title: Firing of an estate agent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.