पोलीस कर्मचाऱ्यावर भरदिवसा गोळीबार

By Admin | Updated: December 23, 2015 00:15 IST2015-12-23T00:15:51+5:302015-12-23T00:15:51+5:30

दहशतीच्या जोरावर शहरात उच्छाद मांडलेल्या गुन्हेगारांची मजल आता थेट पोलिसांवर हल्ला करण्यापर्यंत गेली आहे. सिग्नलला उभे असताना एकाच्या कंबरेला पिस्तूल दिसल्यामुळे

Firing day on police personnel | पोलीस कर्मचाऱ्यावर भरदिवसा गोळीबार

पोलीस कर्मचाऱ्यावर भरदिवसा गोळीबार

पुणे : दहशतीच्या जोरावर शहरात उच्छाद मांडलेल्या गुन्हेगारांची मजल आता थेट पोलिसांवर हल्ला करण्यापर्यंत गेली आहे. सिग्नलला उभे असताना एकाच्या कंबरेला पिस्तूल दिसल्यामुळे पाठलाग करीत त्याला पकडण्याचा प्रयत्न करणाऱ्या पोलिसावर भरदिवसा भरवस्तीत गोळी झाडण्यात आल्याची घटना डेक्कन भागात मंगळवारी संध्याकाळी घडली. सुदैवाने हा पोलीस कर्मचारी थोडक्यात बचावला. त्याच्या बुटाला गोळी लागली. सुट्टीवर असतानाही आपल्या धैर्याची चुणूक दाखवणाऱ्या पोलिसाचे कौतुक होत आहे.
मयूर राजेंद्र भोकरे असे जखमी पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. मयूर भोकरे शिवाजीनगर न्यायालयातील सुरक्षा पथकामध्ये नेमणुकीस आहेत. परिमंडल एकचे उपायुक्त तुषार दोषी यांनी दिलेल्या माहितीनुसार, भोकरे आणि त्यांचा मित्र संदेश खडके हे दोघेही बालगंधर्व रंगमंदिराजवळील स्वातंत्र्यवीर सावरकर भवनमध्ये कामानिमित्त गेले होते. तेथून साई सर्व्हिस स्टेशनसमोरून जात असताना त्यांना दुचाकीवरून जाणारे दोघे दिसले. त्यातील पाठीमागे बसलेल्या एकाचा शर्ट वर सरकल्यामुळे कंबरेला लावलेले पिस्तूल भोकरे यांच्या नजरेस पडले. त्यांनी याबाबत त्या दोघांना हटकले असता आरोपींनी पळ काढला. भोकरे यांनी खडकेच्या मदतीने दुचाकीवरून दोघांचा पाठलाग सुरू केला. त्यांना चुकविण्यासाठी आरोपी डेक्कनकडील गल्लीबोळात घुसले. आपटे रस्त्यावरच्या १०१६ पाटील बंगला परिसरातील एका बोळात आरोपींपाठोपाठ भोकरेही घुसले. बोळ पुढे बंद असल्यामुळे एकाला भोकरेंनी पकडले. त्यांच्यामध्ये झटापट सुरू असतानाच एकाने गावठी कट्ट्यामधून एक गोळी झाडली. ही गोळी खालच्या दिशेने गेल्यामुळे बुटाला घासून गेली. त्यानंतरही त्यांनी आरोपीला पकडून ठेवले होते. मात्र भोकरेंच्या पोटाला पिस्तूल लावल्यामुळे त्याला सोडावे लागले आणि दोघेही पसार झाले. त्यानंतर लगेचच सहायक आयुक्त प्रवीण कुलकर्णी, वरिष्ठ निरीक्षक अनिल पाटील, निरीक्षक (गुन्हे) सुचेता खोकले यांनी घटनास्थळी धाव घेतली.

Web Title: Firing day on police personnel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.