मंगलाष्टकांनंतर होतेय फटाक्यांची आतषबाजी

By Admin | Updated: November 15, 2016 02:54 IST2016-11-15T02:54:03+5:302016-11-15T02:54:03+5:30

घरासमोरील अंगण आणि त्यातील तुळशी वृंदावन नाहीसे झाले असले, तरीही किवळे-विकासनगर व रावेत भागात फ्लॅट संस्कृतीमध्ये राहणाऱ्या मंडळींनी

Fireworks fireworks after the Mangalashakti | मंगलाष्टकांनंतर होतेय फटाक्यांची आतषबाजी

मंगलाष्टकांनंतर होतेय फटाक्यांची आतषबाजी

देहूरोड : घरासमोरील अंगण आणि त्यातील तुळशी वृंदावन नाहीसे झाले असले, तरीही किवळे-विकासनगर व रावेत भागात फ्लॅट संस्कृतीमध्ये राहणाऱ्या मंडळींनी आजही तुळशीविवाहाची परंपरा जपली आहे. देहूरोड कॅन्टोन्मेंटच्या ग्रामीण भागातील चिंचोली, किन्हई, शेलारवाडी व मामुर्डी भागात अद्यापही बहुतांश घरांपुढे तुळशी वृंदावन असल्याने साग्रसंगीत तुळशीविवाह लावण्यात येत असल्याचे चित्र दिसून आले. ‘तदैव लग्नम्...’ असे शब्द कानावर पडताक्षणी चिमुकल्यांनी आपल्याजवळील फटाके वाजविण्याचा आनंद घेतला.
रावेत, किवळे व विकासनगर भागात मोठ्या प्रमाणात नागरीकरण झाले असतानाही तुळशीविवाहासाठी जय्यत तयारी करण्यात आली होती. ठिकठिकाणी तुळशी नवरीच्या थाटात नटविल्या होत्या. मोठ्या अंगणातल्या वृंदावनाची सर छोटेखानी कुंडीतल्या तुळशीला नसली, तरीही या कुंड्यांना गेरू लावून तुळशीविवाहाची तयारी करण्यात आली होती. ऊस, बोरे, चिंचा अशा खट्ट्या-मिठ्ठ्यांना या विवाहामध्ये महत्त्वाचे स्थान असते. ग्रामीण भागात रांगोळीने सजलेल्या अंगणात व सदनिकेच्यासमोर गॅलरीत फुलांच्या तोरणमाळा व रोषणाई केलेल्या प्रसन्न वातावरणामध्ये ‘आली घटिका समीप’चे सूर आळवले गेले. ठिकठिकाणच्या सोसायट्या, वाडे व वस्त्यांमध्येही तुलसीविवाह उत्साहात लावण्यात आले. पारंपरिक पद्धतीने विवाहसोहळा झाल्यानंतर उपस्थित महिलांनी तुळशीचे दर्शन घेतले.
विष्णूला जिंकण्यासाठी वृंदेने तुळशीरूप घेऊन केलेल्या विवाहाचे स्मरण म्हणून तुळशीविवाह साजरा करण्यात येतो. त्यातील आध्यात्मिक अर्थाचा अधिक व्यापक अर्थाने विचार केल्यास तुळस ही आरोग्यासाठी संजीवनी ठरते, ती सदाबहार असते, तिचे चैतन्य नटलेल्या नव्या नवरीसारखे घरादारावर राहावे, असा उदात्त विचार त्यामागे असतो.
तुळशीविवाहासाठी परिसरातील बहुतांश घरांसमोर, तसेच वृंदावनाभोवती रांगोळी काढण्यात आली होती. आंतरपाट, अक्षता आणल्यानंतर हा सोहळा घरांसमोर सुरू झाला. याविषयी उत्सुकता असलेल्या बालगोपाळांनी या वेळी गर्दी केली होती. (वार्ताहर)

Web Title: Fireworks fireworks after the Mangalashakti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.