महापालिकेचे अग्निशामक केंद्र धूळ खात
By Admin | Updated: May 18, 2015 05:47 IST2015-05-18T05:47:15+5:302015-05-18T05:47:15+5:30
मार्केट यार्ड परिसरातील मोक्याच्या जागेवर अग्निशामक केंद्र उभारले आहे. मात्र, महापालिकेतील विविध विभागांमध्ये समन्वयाचा अभाव व प्रशासनाच्या

महापालिकेचे अग्निशामक केंद्र धूळ खात
पुणे : मार्केट यार्ड परिसरातील मोक्याच्या जागेवर अग्निशामक केंद्र उभारले आहे. मात्र, महापालिकेतील विविध विभागांमध्ये समन्वयाचा अभाव व प्रशासनाच्या उदासीन कारभारामुळे सहा महिन्यांपासून केंद्राचा ताबा घेण्यात आलेला नाही. एका बाजूला मार्केट यार्ड परिसरात वारंवार आगीच्या घटना घडत असताना अग्निशामक केंद्र धूळ खात पडल्याची गंभीर बाब उजेडात आली आहे.
महापालिकेच्या जुन्या हद्दीतील १९८७च्या प्रारूप विकास आराखड्यात गंगाधाम चौकातील सर्व्हे नंबर ५७८ येथील १० हजार चौरस मीटर जागेवर अग्निशामक केंद्राचे आरक्षण होते. मात्र, महापालिकेने अनेक वर्षे जागेचा ताबा न घेतल्याने जागा मालकांनी आरक्षण बदलाचा प्रस्ताव दिला होता. त्यावेळी स्थानिक नागरिकांनी आरक्षण बदलाला विरोध केला. ‘लोकमत’ने ‘आरक्षण बदलाचा घाट’ या वृत्तमालिकेद्वारे या विषयाला वाचा फोडली. त्यानंतर प्रशासन व स्थानिक लोकप्रतिनिधी खडबडून जागे झाले होते. स्थानिक आमदार माधुरी मिसाळ यांनी जागेवर पाहणी करून प्रशासनाला तातडीने कार्यवाहीच्या सूचना दिल्या होत्या.
दरम्यान, तत्कालीन महापालिका आयुक्त महेश झगडे यांनी आरक्षण बदलाच्या प्रस्तावाला स्थगिती दिली. त्यानंतर आयुक्त महेश पाठक यांनी संबंधित विकसकाला आर-७ नुसार अग्निशामक केंद्र विकसित करण्यास सप्टेंबर २०१२ मध्ये मान्यता दिली होती. ‘लोकमत’च्या पाठपुराव्यामुळे अग्निशामक केंद्र उभारणीचे काम मार्च २०१३ मध्ये सुरू झाले. विकसकाने दीड वर्षात केंद्राची उभारणी केली. त्यानंतर सहा महिन्यांपूर्वी महापालिका प्रशासनाला केंद्र ताब्यात घेण्याचे पत्र दिले आहे. मात्र, प्रशासनाच्या उदासीन कारभारामुळे अग्निशामक केंद्र ताब्यात घेण्याची कार्यवाही झालेली नाही.
स्वारगेट ते कात्रज या भागात अनेक झोपडपट्ट्या आहेत. मोठी लोकसंख्या परिसरात निवासासाठी असूनही एकही अग्निशामक केंद्र नाही. गेल्या महिन्याभरात मार्केट यार्ड परिसरात आगीच्या दोन मोठ्या घटना घडल्या आहेत. तरीही प्रशासन अग्निशामक केंद्र ताब्यात घेण्यासाठी गंभीर नसल्याचे दिसून येते. महापालिकाच्या भूमी-जिंदगी, भवन व अग्निशामक विभागातील समन्वया अभावी कार्यवाही ठप्प आहे. शिवाय स्थानिक लोकप्रतिनिधी या गंभीर विषयांवर गप्प असल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे.(प्रतिनिधी)