मंचर येथे शुज वर्ड दुकानाला आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:10 IST2021-07-28T04:10:40+5:302021-07-28T04:10:40+5:30
मंचर : शहराच्या भरवस्तीत असलेल्या ग्रामपंचायत कॉम्प्लेक्समधील शूज वर्ड या दुकानाला आग लागून ३२ लाख रुपयांचे साहित्य जळून खाक ...

मंचर येथे शुज वर्ड दुकानाला आग
मंचर : शहराच्या भरवस्तीत असलेल्या ग्रामपंचायत कॉम्प्लेक्समधील शूज वर्ड या दुकानाला आग लागून ३२ लाख रुपयांचे साहित्य जळून खाक झाले आहे. सुदैवाने आग वेळीच विझवण्यात यश आल्याने ती इतर दुकानांपर्यंत पसरली नाही. आगीची ही घटना मंगळवारी पहाटे घडली. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
दुकान मालक अतुल गेनभाऊ निघोट (रा.निघोटवाडी ता. आंबेगाव) यांनी मंचर पोलीस ठाण्यात आगीची माहिती दिली. निघोट यांचे मंचर येथील ग्रामपंचायत इमारतीच्या गाळ्यामध्ये शूजचे दुकान आहे. सोमवारी सायंकाळी दुकान बंद करून घरी गेले होते. त्यानंतर रात्री सव्वा दोनच्या सुमारास दुकानाला आग लागली. श्री भैरवनाथ नागरी सहकारी पतसंस्थेचे सुरक्षा रक्षक नयन बहादुर गोरखा यांना दुकानातून धूर येताना दिसला. त्यांनी जवळ जाऊन पाहिले असता आग लागली होती. गोरखा यांनी तत्परतेने ही माहिती पतसंस्थेचे संचालक सागर काजळे व उपमुख्य कार्यकारी अधिकारी रमेश खरमाळे यांना दिली. रमेश खरमाळे यांनी पोलिस ठाण्याला कळविले. बीट मार्शल ड्युटीवर असलेले पोलीस कॉन्स्टेबल रामदास तनपुरे यांचा दुकान मालक निघोट यांना दुकानाला आग लागल्याचे सांगितले. त्यावेळी निघोट व त्याचा भाऊ दुकानात आले. दुकानामधून धूर येत होता. त्यांनी ताबडतोब दुकानाचे शटर उघडले असता दुकानातील लाईटचा बोर्ड जळालेला दिसला. यामुळे ही आग शॉर्टसर्किट होऊन लागली असावी. दरम्यान मंचर गावचे उपसरपंच युवराज बाणखेले यांना फोन करून कळवले असता त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. तसेच पोलिसही घटनास्थळी आले. मंचर ग्रामपंचायतीच्या दोन टँकरने आग विझवण्याचा प्रयत्न केला. परंतु आग आटोक्यात येत नसल्याचे पाहून मंचर पोलीस ठाण्याो पोलीस उपनिरीक्षक अपर्णा जाधव यांनी राजगुरूनगर नगरपरिषदेच्या अग्निशमन विभागाला फोन करून बोलाविले. अग्निशमन बंब आल्यावर ही आग आटोक्यात आणण्यात पहाटे ५ वाजता यश आले. यावेळी माजी सरपंच दत्ता गांजाळे, ग्रामपंचायत सदस्य शाम थोरात, अरुणनाना बाणखेले, सतीश बाणखेले, पोलीस निरीक्षक सुधाकर कोरे, सोमनाथ वाफगावकर उपस्थित होते. यावेळी नागरिकांनी तसेच ग्रामपंचायत कर्मचारी बाळू लोंढे, दिलीप थोरात,रमेश डिंगोरकर व इतरांनी आग विझवण्यासाठी प्रयत्न केले. या आगीत दुकानातील सर्व साहित्य आगीत भस्मसात झाले. पोलीस नाईक राजेंद्र हिले यांनी पंचनामा केला आहे.
फोटो :