कापूरव्होळ येथे फूटवेअर दुकानाला आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:10 IST2021-03-27T04:10:35+5:302021-03-27T04:10:35+5:30
कापूरव्होळ येथील कापूरव्होळ-सासवड रस्त्यालगत चंद्रकांत पोटे यांच्या शुभम फूटवेअरच्या दुकानास लागलेली आग आटोक्यात आणण्यासाठी ग्रामस्थांनी खूप प्रयत्न ...

कापूरव्होळ येथे फूटवेअर दुकानाला आग
कापूरव्होळ येथील कापूरव्होळ-सासवड रस्त्यालगत चंद्रकांत पोटे यांच्या शुभम फूटवेअरच्या दुकानास लागलेली आग आटोक्यात आणण्यासाठी ग्रामस्थांनी खूप प्रयत्न केले. मात्र, दुकानातील माल रबरी असल्याने आगीने आणखीच रौद्र रूप धारण केले होते. आग आटोक्यात आणत असताना प्रसंगावधानामुळे या फूटवेअरच्या दुकानाशेजारील दुकानांना आगीचा त्रास होऊ नये, यासाठी समीर गाडे, उद्योजक लखन दळवी, राहुल गाडे, मयूर गाडे, उमेश गुरव, चेतन गाडे, योगेश गाडे, गणेश गाडे, राहुल साहेबराव गाडे, महेश शिर्के, राजेंद्र गाडे आदी कापूरव्होळ ग्रामस्थांनी आग विझविण्यासाठी खूप प्रयत्न केले. त्याच वेळी प्रसंगावधान ओळखून येथील उद्योजक लखन दळवी आणि त्यांच्या मित्रांनी भोर येथील नगरपालिकेच्या अग्निशमन दलास अग्नितांडवाची खबर देऊन ताबडतोब घटनास्थळी यावे, असे सांगितले होते. त्याच वेळी राजगडचे ठाण्याचे सपोनी राहुल साबळे, सहायक फौजदार अंकुश खोमणे व महामार्ग पोलीस हवालदार भीमराव शेगर, अमोल खुटवड आदी घटनास्थळी जाऊन परिस्थिती नियंत्रणात आणली.
भोर नगरपालिकेचे अग्निशमन दल तातडीने घटनास्थळी दाखल होत, विशेष प्रयत्नांनंतर रात्री ९.३० नंतर आग आटोक्यात आणली. यामुळे आसपासच्या दुकानांचे नुकसान टळले. शॉर्टसर्किटने ही आग लागली की अन्य कारणांनी, याविषयी माहिती मिळू शकली नाही.
पुणे-सातारा महामार्गावर कात्रज बोगद्यापासून सारोळ्यापर्यंत अनेक कारखाने, मोठमोठे हॉटेल व्यवसाय व अनेक गावे आहेत. मात्र, या महामार्गालगत जर असा काही प्रसंग उद्भवल्यास महामार्गावर कोठेच अग्निशमन दल नाही. त्यामुळे महामार्गालगत अग्निशमन दल अत्यावश्यक आहे, अशी मागणी लखन दळवी यांनी नागरिकांच्या वतीने प्रशासनाकडे केली असल्याचे सांगण्यात आले.
पुणे-सातारा महामार्गालगतच्या कापूरव्होळ येथे फूटवेअर दुकानाला अचानक लागलेल्या आगीने सुमारे तीन लाख रुपयांपेक्षा अधिक मालाचे नुकसान झाले आहे.