अग्निशामकची नियमावली अनधिकृत
By Admin | Updated: March 12, 2015 06:21 IST2015-03-12T06:21:27+5:302015-03-12T06:21:27+5:30
राज्याच्या अग्निशामक संचालनालयाने केवळ पुणे महापालिकेच्या अग्निशमन अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र सेवा नियमावली तयार क

अग्निशामकची नियमावली अनधिकृत
दीपक जाधव, पुणे
राज्याच्या अग्निशामक संचालनालयाने केवळ पुणे महापालिकेच्या अग्निशमन अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र सेवा नियमावली तयार करून अंमलबजावणीसाठी पुणे महापालिकेकडे पाठविली आहे. या नियमावलीला नगरविकास विभागाची मान्यता न घेता, तसेच गॅझेटमध्ये प्रकाशित न करता अंमलबजावणीसाठी पाठवून दिल्याची धक्कादायक बाब उजेडात आली आहे. यामुळे मुख्यमंत्र्यांच्या अधिकारावरच गदा आणली गेल्याने अनेक कायदेशीर प्रश्न निर्माण झाले आहेत.
महापालिकेचे अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठीची सेवा नियमावली आॅगस्ट २०१४ मध्ये गॅझेटमध्ये प्रकाशित करण्यात आली. त्या वेळी अग्निशमन सेवेसाठी राज्य अग्निशमन संचालनालयाकडून सर्व पालिकांसाठी स्वतंत्र नियमावली तयार करण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आले होते. दरम्यान, केवळ पुणे पालिकेच्या अग्निशमन अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी अग्निशमन संचालक एस. एस. वारीक यांनी १२ फेब्रुवारी २०१५ रोजी स्वतंत्र नियमावली तयार करून अंमलबजावणीसाठी पाठविली आहे. अग्निशामक दलातील काही विशिष्ट अधिकाऱ्यांना फायदा व्हावा, या हेतूने त्यामध्ये बदल करून ही नियमावली तयार करण्यात आल्याची माहिती उजेडात आली आहे.
मुख्य अग्निशमन अधिकारी हे पद परीक्षा, मुलाखत घेऊन भरण्याऐवजी ते खात्यांतर्गत बढतीने भरले जावे, असा बदल करण्यात आला. तसेच या पदाकरिता अग्निशमनचे काही डिप्लोमा आवश्यक असताना ही तरतूद वगळण्यात आली आहे. इतर महापालिका तसेच एमआयडींसीमध्ये अग्निशमक अधिकारी हे विज्ञान शाखेतील असणे बंधनकारक असताना पुण्याच्या नियमावलीनुसार कोणत्याही शाखेचा पदवीधर पात्र ठरणार आहे. (प्रतिनिधी)