सॅनिटायझर बनविणाऱ्या कंपनीत आग; १७ जणांचा होरपळून मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:14 IST2021-06-09T04:14:28+5:302021-06-09T04:14:28+5:30
पिरंगुट : पौड रस्त्यावरील घोटवडे फाट्याजवळील उरवडे रोड येथे एका सॅनिटायझर बनविणाऱ्या कंपनीला भीषण आग लागून १७ जणांचा ...

सॅनिटायझर बनविणाऱ्या कंपनीत आग; १७ जणांचा होरपळून मृत्यू
पिरंगुट : पौड रस्त्यावरील घोटवडे फाट्याजवळील उरवडे रोड येथे एका सॅनिटायझर बनविणाऱ्या कंपनीला भीषण आग लागून १७ जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. यामध्ये प्रामुख्याने महिला कामगारांचा समावेश आहे. आणखी काही कामगार अडकले असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे. सोमवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास ही आग लागली. घटनेची माहिती मिळाल्यावर पुणे महापालिका आणि पीएमआरडीएच्या अग्निशमक दलाच्या गाड्या तातडीने रवाना झाल्या. मात्र, सॅनिटायझर बनविले जात असल्याने आगीने थोड्याच वेळात रौद्र रूप धारण केले होते. स्थानिक ग्रामस्थांनीही तातडीने धाव घेतली. घटनास्थळी आक्रोश आणि किंकाळ्या ऐकू येत होत्या. जेसीबीच्या साहाय्याने भिंत फोडून कामगारांना सुखरूप बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू केले. प्राथमिक माहितीनुसार ३७ पैकी १० कामगारांना बाहेर काढण्यात यश मिळाले. मात्र, १७ कामगार अडकले होते. सायंकाळी उशिरापर्यंत १७ जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास आग आटोक्यात आली. त्यानंतर अग्निशमन दलाने कुलिंग सुरू केले आहे. त्यानंतरच आगीतील मृत्यूचा नेमका आकडा समजेल, असे पोलिसांनी सांगितले. आग नेमकी कशामुळे लागली, ते समजू शकले नाही. मात्र, आगीची तीव्रता पाहता आतमध्ये मोठ्या प्रमाणात सॅनिटायजर तसेच इतर ज्वलनशील रसायन साठा असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. पिरंगुट एमआयडीसीमध्ये अनेक लहान मोठ्या कंपन्या असून, येथे हजारो कामगार काम करीत आहेत.
घटनास्थळी तहसीलदार अभय चव्हाण आणि पोलीस निरीक्षक अशोक धुमाळ व इतर पोलीस कर्मचारी यांनी लागलीच धाव घेतली आहे.