पुण्यात बेकरीला आग, सहा जणांचा होरपळून मृत्यू
By Admin | Updated: December 30, 2016 16:00 IST2016-12-30T07:16:27+5:302016-12-30T16:00:00+5:30
पुण्यातील कोंढवा बुद्रुक परिसरात असलेल्या एका बेकरीला आग लागून सहा जणांचा मृत्यू झाल्याचे समजते.

पुण्यात बेकरीला आग, सहा जणांचा होरपळून मृत्यू
>ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 30 - शॉर्टसर्किटमुळे बेकरीला लागलेल्या आगीमध्ये सहा कामगारांचा झोपेतच होरपळून मृत्यू झाल्याची भीषण घटना समोर आली आहे. कोंढव्यातील गगन एव्हेन्यू इमारतीमध्ये पहाटे पावणेपाचच्या सुमारास ही घटना घडली. आकाराने छोट्या असलेल्या या बेकरीच्या पोटमाळ्यावर हे कामगार झोपलेले होते. बेकरीच्या शटरला बाहेरुन कुलूप लावलेले असल्यामुळे बचावकार्यामध्ये अडथळे आल्याची माहिती अग्निशामक दलाच्या अधिका-यांनी दिली.
इर्शाद खान (वय २६), शानू अन्सारी (वय २२), झाकीर अन्सारी(वय २४), फहिम अन्सारी (वय २४), जुनेद अन्सारी (वय २५), निशाण अन्सारी (वय २९, सर्व रा. बीजनौर, उत्तरप्रदेश) अशी मृतांची नावे आहेत. अग्निशामक दलाच्या अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोंढव्यातील गगन एव्हेन्यू इमारतीमध्ये ‘बेक्स अॅन्ड केक्स’ नावाची बेकरी आहे. ही इमारत नऊ मजल्यांची असून तळमजल्यावर असलेल्या 200 स्क्वेअर फुटांच्या बेकरीमध्ये तीन भाग करण्यात आलेले आहेत. एका भागामध्ये विक्री काऊंटर आहे. तर मागील भागामध्ये स्वयंपाकासाठी जागा ठेवण्यात आलेली आहे.
याठिकाणी बेकरी पदार्थ तयार केले जातात. तर पोटमाळ्यावर पीठ मळण्यासाठी मोटर बसवण्यात आलेली आहे. तसेच तेथेच मोठा ओव्हनही ठेवण्यात आलेला आहे. साधारणपणे चार फुटांच्या उंचीच्या पोटमाळ्यावरच अडचणीमध्ये सर्व कामगार झोपतात. या बेकरीमधून मोठ्या प्रमाणावर धूर येत असून आग लागल्याची माहिती पहाटे पावणेपाचच्या सुमारास अग्निशामक दलाला मिळाली. त्यानुसार कोंढवा अग्निशामक दलाचे जवान बंबासह घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळी बेकरीच्या शटरला बाहेरुन कुलूप लावलेले होते. हे कुलूप तोडण्याचा प्रयत्न करीत असतानाच बेकरीचे मालक अब्दुल्ला मोहम्मद युसुफ चिन्नीवार तेथे आले. त्यांची कुलूप उघडल्यावर जवानांनी आतमध्ये जाण्याचा प्रयत्न केला. परंतु शटर तुटल्याने सारखे खाली पडत होते.
शेवटी त्याला टेकू लावून जवान आतमध्ये घुसले. आगीमध्ये जवळपास निम्मी बेकरी जळून खाक झाली होती. पाण्याचा मारा करुन आग विझवण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यानंतर मुख्य अग्निशमन केंद्रामधून मदत मागवण्यात आली. केंद्र प्रमुख प्रकाश गोरे अन्य जवानांसह घटनास्थळी दाखल झाले. त्यांच्यामधील एक जवान पीए सेट घालून आतमध्ये घुसला. त्यावेळी चिन्नीवार याने पोटमाळ्यावर कामगार झोपल्याचे सांगितले. चिंचोळ्या लोखंडी जिन्याने जवान पोटमाळ्यावर गेले. त्यावेळी एकमेकांना बिलगून झोपलेल्या अवस्थेतच सहा कामगारांचे मृतदेह पडलेले होते. हृदद्रावक आणि भयावह असे ते चित्र होते. जवानांनी चादरीमध्ये गुंडाळून हे मृतदेह खाली उतरवले. दरम्यान सामाजिक संस्था आणि 108 क्रमांकांच्या रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या होत्या.
कामगारांची जागेवरच डॉक्टरांनी तपासणी केली. मात्र, कामगारांचा मृत्यू झाल्यामुळे त्यांचे मृतदेह ससून रुग्णालयात हलवण्यात आले. जवानांनी बेकरीमधून वेळीच 3 व्यावसायिक सिलेंडर्स आणि घरगुती वापराचा एक सिलेंडर बाहेर काढल्यामुळे अनर्थ टळला. आजुबाजुच्या दुकानांमध्येही जाऊन तपासणी करण्यात आली. पाण्याचा आणखी मारा करुन आग पूर्णपणे विझवण्यात आली. अग्निशामक दलाचे प्रमुख प्रशांत रणपिसे, केंद्र प्रमुख प्रकाश गोरे, तांडेल राजाराम केदारी, जवान अमित शिंदे, सागर दळवी, सुभाष जाधव, योगेश चोरगे, रवी बारटक्के, संग्राम देशमुख, प्रताप फणसे, चालक तडवी, कोळी यांनी दोन बंब, 3 रुग्णवाहिका, एका छोट्या गाडीच्या मदतीने बचावकार्य केले.
बेकरीमधील संपूर्ण साहित्य आगीमध्ये खाक झाले. अत्यंत छोट्या आकाराच्या या बेकरीच्या पोटमाळ्यावर कामगार झोपले होते. हे कामगार जर खालच्या भागात झोपले असते तर कदाचित त्यांचे प्राण वाचू शकले असते. शटरला जर बाहेरुन कुलूप लावण्यात आलेले नसते तर कदाचित त्यांचे प्राण वाचवणे शक्य झाले असते. धुर कोंडल्यामुळे गुदरमरुन त्यांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये 20 ते 26 या वयोगटातील तरुणांचा समावेश आहे.
'बेक्स अॅन्ड केक्स' ही बेकरी अब्दुल्ला मोहम्मद युसुफ चिन्नीवार (वय २७, रा. कुमार होम्स, एनआयबीएम रस्ता, कोंढवा), तय्यब अन्सारी (वय २६, रा. सय्यदनगर, हडपसर), मुनीर चिन्नीवार (वय ६२, रा. पारगे नगर, कोंढवा) यांच्या भागीदारी मालकीची आहे. एप्रिल 2015 मध्ये ही बेकरी सुरू करण्यात आलेली आहे. रात्री कामगारांना आतमध्ये झोपायला लावून बाहेरुन कुलूप लावण्यामागचे नेमके कारण काय याचा पोलीस शोध घेत आहेत.