सिलिंडरच्या स्फोटात अग्निशमन दलाचा जवान जखमी
By Admin | Updated: April 19, 2017 14:17 IST2017-04-19T14:17:27+5:302017-04-19T14:17:27+5:30
जांभुळवाडी परिसरातील कात्रज येथील टेल्को कॉलनीमधील पावडर कोटींग कंपनीला लागलेल्या आगीत 5 सिलिंडरचे स्फोट झाले.यात फायर ब्रिगेडचा एक जवान जखमी झाला आहे.

सिलिंडरच्या स्फोटात अग्निशमन दलाचा जवान जखमी
>ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 19 - जांभुळवाडी परिसरातील कात्रज येथील टेल्को कॉलनीमधील पावडर कोटींग कंपनीला लागलेल्या आगीत 5 सिलिंडरचे स्फोट झाले. यामध्ये अग्निशमन दलाचे जवान शिवदास खुटवड जखमी झाले आहेत. त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
याठिकाणी पत्र्याच्या शेडमध्ये पावडर कोटींगचा कारखाना आहे. येथे लागलेली आग नियंत्रणात आणण्यासाठी कारखान्याचे कुलूप उडताना सिलिंडरचा स्फोट झाला. हा स्फोटामुळे कारखान्याचा दरवाजा उडाला आणि शिवदास खुटवड अंगावर पडला. या घटनेत त्यांच्या छातीला दुखपात झाली.
यावेळी त्यांना तातडीने भारती रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, डॉक्टरांनी खटवड यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती दिली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, हॉस्पिटलमधे पैसे भरल्याशिवाय उपचार करणार नाही, असा वाद झाल्याची माहिती समोर आली आहे. नंतर मग पैसे भरतो पण उपचार करा, अशी हमी दिल्यावर व तेथील शिकाऊ डॉक्टरांनी मदत केल्यानंतर खटवड यांना अॅडमिट करुन घेण्यात आले, अशा आशयाचे संदेश फिरत होते. मात्र असे काहीही घडले नसल्याचे स्पष्टीकरण स्टेशन ऑफिसर संजय रामटेके यांनी दिले आहे. उलट शिकाऊ डॉक्टरांनी आम्ही पैसे भरतो, असे सांगून माणुसकी दाखवल्याचे त्यांनी सांगितले.