तीन महिन्यांत ६०० ठिकाणी आग

By Admin | Updated: April 4, 2016 01:37 IST2016-04-04T01:37:25+5:302016-04-04T01:37:25+5:30

एकीकडे अंगाची काहिली करणाऱ्या उन्हाने पुणेकर त्रस्त झालेले आहेत, तर दुसरीकडे आगीच्या घटनांनी शहर होरपळत आहे. मागील तीन महिन्यांत शहराच्या विविध भागात

Fire in 600 places in three months | तीन महिन्यांत ६०० ठिकाणी आग

तीन महिन्यांत ६०० ठिकाणी आग

पुणे : एकीकडे अंगाची काहिली करणाऱ्या उन्हाने पुणेकर त्रस्त झालेले आहेत, तर दुसरीकडे आगीच्या घटनांनी शहर होरपळत आहे. मागील तीन महिन्यांत शहराच्या विविध भागात तब्बल ६०० आगीच्या घटना घडल्या आहेत. याअर्थी शहरात दररोज सरासरी ६ ते ७ कमी-अधिक तीव्रतेच्या आगीच्या घटना घडत आहेत. यामध्ये दुचाकींना आग लागल्यापासून कचरा पेटणे, शॉर्टसर्किट होऊन आग लागणे, गॅसचा भडका, स्फोट अशा विविध घटनांचा समावेश आहे.
‘स्मार्ट सिटी’कडे वाटचाल करू पाहणाऱ्या पुणे शहरात मागील काही दिवसांत सोसायट्यांमधील दुचाकींना आगी लागण्याचे काही प्रकार घडले. त्यामुळे वाहनांच्या जळितकांडाचा विषय चर्चेचा ठरला. पोलिसांसमोरही जळितकांड घडवून आणणाऱ्यांचे आव्हान उभे ठाकले. या तीन महिन्यांत सोसायट्यांमध्ये वाहनांना आगीच्या सहा, तर अन्य ठिकाणी दुचाकी वाहनांना आग लागण्याच्या दहा घटना तर चारचाकी वाहनांना आग लागण्याच्या ४६ घटना घडल्या आहेत; मात्र इतर आगीच्या तुलनेत वाहनांना आग लागण्याचे प्रमाण तुलनेने खूप कमी असल्याचे दिसून येते. शहरात वाहनांना आगीसह, कचरा पेटणे, घर, दुकान, कार्यालय, गोदामाला; तसेच इतर आगीच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत आहेत. दररोज शहरात आगीच्या किमान सहा ते सात घटना घडत आहेत. एप्रिल महिन्याची सुरुवातही आगीने झाली आहे. मार्केट यार्डाच्या पार्किंगमध्ये तीन ट्रक पेटल्याची घटना शुक्रवारी घडली, तर शनिवारी सदाशिव पेठेतील एका गोदामाला आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाले.
अग्निशमन दलाचे प्रमुख प्रशांत रणपिसे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मार्च अखेरपर्यंत तीन महिन्यांत शहरात आगीच्या घटनांचे तब्बल ६०० कॉल आले आहेत. मागील काही महिन्यांत आगीच्या घटनांमध्ये तुलनेने वाढ झाल्याचे दिसून येते. तीन महिन्यांत एवढ्या घटना यापूर्वी घडल्या नाहीत. त्यामध्ये सर्व प्रकारच्या आगीच्या घटनांचा समावेश आहे. वाहनांना आग लागण्याच्या ६८ घटना घडल्या आहेत. या घटना वगळल्यास इतर तब्बल ५३२ घटना इतर आगीच्या आहेत. त्यामुळे या तीन महिन्यांत अग्निशमन दलाला मोठी कसरत करावी लागली.

Web Title: Fire in 600 places in three months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.