सिम कार्ड विक्रीसाठी घेताहेत बोटांचे ठसे
By Admin | Updated: September 22, 2015 03:12 IST2015-09-22T03:12:01+5:302015-09-22T03:12:01+5:30
‘कोणीही या अन् सिम कार्ड घेऊन जा’ या मथळ्याखाली ‘लोकमत’मध्ये ‘स्टिंग आॅपरेशन’ प्रसिद्ध झाल्यानंतर सिम कार्ड विक्रीच्या कंपन्यांना जाग आली आहे.

सिम कार्ड विक्रीसाठी घेताहेत बोटांचे ठसे
पिंपरी : ‘कोणीही या अन् सिम कार्ड घेऊन जा’ या मथळ्याखाली ‘लोकमत’मध्ये ‘स्टिंग आॅपरेशन’ प्रसिद्ध झाल्यानंतर सिम कार्ड विक्रीच्या कंपन्यांना जाग आली आहे. कागदपत्रांची शहानिशा, त्याच्या प्रत्येकी दोन प्रती अन् हातांच्या बोटांचे ठसे घेतल्यानंतरच आता सिम कार्ड दिले जात आहे.
मोबाइलमधील सिम कार्ड रस्त्याच्या कडेच्या स्टॉलवर मिळते. मात्र, या ठिकाणी सिम कार्ड देताना संबंधित सिम कार्ड कंपनीकडून हवी तितकी खबरदारी घेतली जात नाही. गुन्हेगारांकडून अशा प्रकारे सिम कार्ड खरेदी करून त्याचा गैरवापर केला जात असल्याचे समोर आले आहे.
अपुरी कागदपत्रे, फोटोही अस्पष्ट, मूळ कागदपत्रांची तपासणी व पडताळणी नाही की, कार्ड घेणारी व्यक्ती उपस्थित नसतानाही मिळणारे कार्ड, अशी परिस्थिती या सिम कार्ड विक्रीच्या स्टॉलवर दिसून आली. ‘लोकमत’ प्रतिनिधींनी केलेल्या ‘स्टिंग आॅपरेशन’मध्ये ही स्थिती समोर आली. प्रतिनिधींनी स्वत: कोणतीही कागदपत्रे न देता सिम कार्ड खरेदी केल्याबाबतचे सचित्र वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर शहरात खळबळ उडाली. संबंधित कंपनींच्या अधिकाऱ्यांनी तत्काळ त्याची दखल घेत स्टॉलधारकांना काही अटी घालून दिल्या आहेत.
यापूर्वी कसलेही कागदपत्रे असले अथवा नसले, तरीही स्टॉलवर लगेचच सिम कार्ड दिले जात होते. आता कार्ड घेण्यासाठी येणाऱ्या व्यक्तीची पूर्ण चौकशी केली जाते, तसेच कागदपत्रांचीही शहानिशा केली जात आहे. आधार कार्ड, पॅन कार्ड या कागदपत्रांच्या प्रत्येकी दोन झेरॉक्स प्रती आणि दोन फोटो घेतले जात आहेत. आता एकऐवजी दोन फोटो मागितले जात आहेत.
दोन झेरॉक्स आणि फोटोंपैकी एक संबंधित स्टॉलधारकाकडे ठेवली जात आहे, तर दुसरी कंपनीला पाठविली जात आहे. ‘रेकॉर्ड’साठी एक प्रत आपल्याकडे ठेवली जात असल्याचे त्यांच्याकडून सांगितले जात आहे. शिवाय, झेरॉक्स प्रतींवर सिम कार्ड घेणाऱ्यांच्या हातांच्या बोटांचे ठसे आणि स्वाक्षरीदेखील घेतली जात आहे. पूर्वी एखाद्या कागदावरदेखील उपलब्ध होणारे सिम कार्ड मिळविण्यासाठी आता कागदपत्रांची पूर्तता करावी लागत आहे. लोकमतमध्ये वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर सर्वत्र खळबळ उडाल्याने ‘सिम कार्ड’ कंपन्यांकडून ही काळजी घेण्यात आली आहे. शिवाय, पोलिसांकडूनही त्यांची नोंद ठेवली जात आहे. (प्रतिनिधी)