अग्रीम रकमेचा तपशील मिळेना
By Admin | Updated: March 22, 2017 03:31 IST2017-03-22T03:31:05+5:302017-03-22T03:31:05+5:30
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे घेतल्या जाणाऱ्या विविध परीक्षांसाठी महाविद्यालयांना विद्यापीठाच्या वित्त व लेखा विभागातर्फे

अग्रीम रकमेचा तपशील मिळेना
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे घेतल्या जाणाऱ्या विविध परीक्षांसाठी महाविद्यालयांना विद्यापीठाच्या वित्त व लेखा विभागातर्फे अग्रीम रक्कम दिली जाते. मात्र, खर्च केलेल्या रकमेचा तपशील देण्यास महाविद्यालयांकडून टाळाटाळ केली जाते. २ ते ३ वर्षांचा कालावधी उलटून गेला तरीही महाविद्यालयांनी विद्यापीठाला खर्चाचा हिशेब दिलेला नाही. त्यामुळे संबंधित महाविद्यालयांच्या खर्चात कपात करण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला आहे.
विद्यापीठाशी संलग्न पुणे, अहमदनगर व नाशिक या तीन जिल्ह्यांमधील महाविद्यालयांना विविध विद्याशाखांच्या परीक्षांसाठी वित्त व लेखा विभागातर्फे तब्बल ३५ कोटी रुपयांचे वितरण केले
जाते.
वर्षातून दोन वेळा परीक्षा घेतल्या जात असल्याने विद्यापीठाकडून मुख्य परीक्षेस २0 कोटी आणि पुरवणी परीक्षेस १५ कोटी अशा ३५ कोटी रुपयांचे वितरण केले जाते. परीक्षेसाठी लागणारे मन्युष्यबळ व इतर व्यवस्थेसाठी महाविद्यालय प्रशासनाकडून आवश्यक खर्च केला जातो. त्याचा तपशील सहा महिन्यांच्या आत विद्यापीठाला सादर करणे बंधनकारक आहे. परंतु, पुण्यासह अहमदनगर व नाशिक जिल्ह्यातील काही महाविद्यालयांनी तीन वर्षांपेक्षा अधिक कालावधी उलटून गेला तरी अद्याप खर्चाचा हिशेब दिलेला नाही. वेळचे वेळी हिशेब दिला जात नसल्याने दरवर्षी विद्यापीठाच्या लेखा परीक्षण अहवालात ७ ते ९ कोटींची रुपयांची तफावत दिसून येते, असे विद्यापीठातील अधिकाऱ्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)