स्वाइन फ्लूचा शहराला विळखा
By Admin | Updated: February 4, 2015 00:18 IST2015-02-04T00:18:48+5:302015-02-04T00:18:48+5:30
शहरात स्वाइन फ्लूची तीव्रता झपाट्याने वाढू लागल्याने पुन्हा २००९ सारखी गंभीर स्थिती उद्भविण्याचा धोका निर्माण झाला आहे.

स्वाइन फ्लूचा शहराला विळखा
पुणे : शहरात स्वाइन फ्लूची तीव्रता झपाट्याने वाढू लागल्याने पुन्हा २००९ सारखी गंभीर स्थिती उद्भविण्याचा धोका निर्माण झाला आहे. गेल्या वर्षभरात शहरात स्वाइन फ्लूचे जेवढे रुग्ण सापडले होते तेवढे या वर्षी अवघ्या ३४ दिवसांमध्ये सापडले आहेत. २०१३ मध्ये स्वाइन फ्लूचे ३५ रुग्ण सापडले होते. या नव्या वर्षात दि. १ जानेवारी ते ३ फेब्रुवारीदरम्यान शहरात स्वाइन फ्लूचे तब्बल ३७ नवे रुग्ण सापडले आहेत. यावरून स्वाइन फ्लूचा पुण्याला पुन्हा विळखा बसत असल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, आज दिवसभरात स्वाइन फ्लूचे नवे ८ रुग्ण सापडल्याने खळबळ उडाली आहे.
गेल्या आठ महिन्यांपासून गायब असलेल्या स्वाइन फ्लूने शहरात थंडी पडताच डोके वर काढण्यास सुरुवात केली होती. जानेवारी महिन्यात स्वाइन फ्लूचे रुग्ण आढळून येऊ लागले. हे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. या महिन्यात स्वाइन फ्लूने ७ जणांचा बळीही घेतला. यात भर म्हणून आज शहरात आणखी ८ नवे रुग्ण सापडले आहेत. या नव्या रुग्णांमुळे रुग्णालयांमध्ये उपचार घेणाऱ्यांची संख्या १५ झाली असून, यापैकी ५ जणांची प्रकृती चिंताजनक असून, त्यांना व्हेंटिलेटवर ठेवण्यात आले आहे. या नव्या रुग्णांमुळे या वर्षातील स्वाइन फ्लूच्या रुग्णांची संख्या ३७ वर पोहोचली आहे.
स्वाइन फ्लूची लागण
होण्याचे प्रमाण वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होऊ लागले असून, सर्दी-खोकला, घसादुखी होताच स्वाइन फ्लूची तपासणी करण्यासाठी नागरिक दवाखाने, रुग्णालयांमध्ये गर्दी करू लागले आहेत. तपासणीसाठीचे हे प्रमाण महिनाभरात दुप्पट झाले
आहे.
आज दिवसभरात तब्बल ९५२ जणांनी स्वाइन फ्लूची तपासणी केली. यापैकी ११० जण संशयित आढळून आले असून, त्यांना टॅमी फ्लू औषधे देण्यात आली आहेत. यापैकी १६ जणांच्या घशातील कफांचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत.(प्रतिनिधी)