अखेर चौधरींचा राजीनामा

By Admin | Updated: May 23, 2014 04:47 IST2014-05-23T04:47:23+5:302014-05-23T04:47:23+5:30

शिक्षण मंडळाच्या शाळांच्या सुशोभीकरणासाठी मुख्याध्यापकांच्या माध्यमातून एक हजार रुपयांना एक याप्रमाणे काही शाळांसाठी कुंड्या खरेदी करण्यात आल्या होत्या

Finally Chaudhary resigns | अखेर चौधरींचा राजीनामा

अखेर चौधरींचा राजीनामा

पुणे : शिक्षण मंडळाच्या शाळांसाठी अवाजवी दराने कुंडी खरेदी प्रकरणी पक्षाच्या आदेशानुसार, नैतिक जबाबदारी स्वीकारत शिक्षण मंडळ अध्यक्ष रवींद्र चौधरी यांनी आज अखेर आपल्या पदाचा राजीनामा दिला. आज सायंकाळी उशिरा महापौर चंचला कोद्रे यांच्याकडे चौधरी यांनी राजीनामा सादर केला. शिक्षण मंडळाच्या शाळांच्या सुशोभीकरणासाठी मुख्याध्यापकांच्या माध्यमातून एक हजार रुपयांना एक याप्रमाणे काही शाळांसाठी कुंड्या खरेदी करण्यात आल्या होत्या. हा प्रकार उजेडात आल्यानंतर सर्वपक्षीय नगरसेवकांनी या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली होती. त्यानुसार, अतिरिक्त आयुक्तांनी केलेल्या चौकशीत ही खरेदी संशयास्पद असून, ती पूर्वनियोजित होती. तसेच, त्यामागे शिक्षण मंडळाच्या निधीचा अपहार करण्याचा हेतू होता, असा ठपका ठेवण्यात आला आहे. ही चौकशी पूर्ण झाल्यानंतर महापालिका आयुक्त विकास देशमुख यांनी तत्काळ शिक्षणप्रमुख तुकाराम सुपे यांना कार्यमुक्त करून त्यांच्या विभागीय चौकशीची शिफारस राज्य शासनाकडे केली होती. तसेच, सुपे यांनी कुंड्यांसाठी काढलेल्या धनादेशावर चौधरी यांची सही असल्याचेही मुख्य सभेत सांगितले होते. त्यानंतर तत्काळ राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्षा खासदार अ‍ॅड. वंदना चव्हाण यांनी पक्षाच्या पदाधिकार्‍यांची बैठक घेतली. या बैठकीत हे प्रकरण चौधरी यांच्याच काळात झाले असल्याने नैतिक जबाबदारी स्वीकारून चौधरी यांनी आज राजीनामा द्यावा, असे आदेश त्यांना पक्षाकडून देण्यात आले होते. त्यानुसार, आज सायंकाळी साडेसहाच्या सुमारास चौधरी यांनी आपला राजीनामा महापौर कोद्रे यांना सादर केला. दरम्यान, राजीनामा देण्यास येत असल्याचे चौधरी यांनी महापौरांना पाचच्या सुमारास कळविले होते. त्यानंतर सुमारे दीड तास उशिराने चौधरी त्यांच्या कार्यालयात गेले. त्यामुळे महापौरांनाही ताटकळत बसावे लागले. त्याबाबत कोद्रे यांनी पत्रकारांशी बोलताना नाराजी व्यक्त केली. या वेळी पत्रकारही उपस्थित होते. मात्र, पत्रकार महापौर दालनातून निघून गेल्यानंतर चौधरी यांनी राजीनामा सादर केला. त्याची माहिती महापौर कार्यालयातून कळविण्यात आली.(प्रतिनिधी)

Web Title: Finally Chaudhary resigns

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.