अखेर न्यायाधीशांची नियुक्ती

By Admin | Updated: June 30, 2015 00:45 IST2015-06-30T00:45:16+5:302015-06-30T00:45:16+5:30

उच्च व तंत्र शिक्षण विभागाने वर्षभराच्या कालावधीनंतर अखेर विद्यापीठ व महाविद्यालयीन न्यायाधिकरणावर निवृत्त जिल्हा न्यायाधीश बी. एन. देशपांडे यांची नियुक्ती केली आहे.

Finally, the appointment of the judges | अखेर न्यायाधीशांची नियुक्ती

अखेर न्यायाधीशांची नियुक्ती

पुणे : उच्च व तंत्र शिक्षण विभागाने वर्षभराच्या कालावधीनंतर अखेर विद्यापीठ व महाविद्यालयीन न्यायाधिकरणावर निवृत्त जिल्हा न्यायाधीश बी. एन. देशपांडे यांची नियुक्ती केली आहे. त्यामुळे प्राचार्य, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची वर्षभरापासून रखडलेली प्रकरणे मार्गी लागणार आहेत.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, शिवाजी विद्यापीठ व सोलापूर विद्यापीठ या तीन विद्यापीठांचे ‘विद्यापीठ व महाविद्यालयीन न्यायाधिकरण’ पुण्यात विद्यापीठाच्या आवारात आहे. शैक्षणिक संस्थांमध्ये काम करताना प्राचार्य, प्राध्यापक तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांच्यावर अन्याय झाल्यास त्यांना न्यायाधिकरणाकडे दाद मागता येते. प्राध्यापक किंवा प्राचार्य यांना शैक्षणिक संस्थेच्या विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यापूर्वी न्यायाधिकरणात अपील करावे लागते.
मागील वर्षभरापासून न्यायाधिकरणाला न्यायाधीशच नसल्याने १०० हून अधिक प्रकरणे प्रलंबित आहेत. त्यामुळे अनेकांना न्यायापासून वंचित राहावे लागत होते. न्यायाधीशांच्या नियुक्तीसाठी ‘लोकमत’ने सातत्याने पाठपुरावा केला होता. (प्रतिनिधी)

शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्यासमोरही हा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता, त्या वेळी त्यांनी निवृत्त न्यायाधीश शासकीय आस्थापनांवर यायला तयार होत नसल्याचे स्पष्ट केले होते. अखेर त्यांनी मागील आठवड्यात न्यायाधीशांची नियुक्ती केली. निवृत्त जिल्हा न्यायाधीश बी. एन. देशपांडे हे न्यायाधिकरणाचे पीठासीन अधिकारी म्हणून पुढील ३ वर्षांसाठी काम पाहतील. त्यांनी २६ जून रोजी न्यायाधिकरणाचा कार्यभार स्वीकारला. या नियुक्तीमुळे प्राचार्य, शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची प्रलंबित प्रकरणे मार्गी लागणार आहेत.

Web Title: Finally, the appointment of the judges

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.