अद्ययावत दर्शनबारीचे काम अंतिम टप्प्यात
By Admin | Updated: June 25, 2016 00:35 IST2016-06-25T00:35:52+5:302016-06-25T00:35:52+5:30
संत ज्ञानेश्वरमहाराज आषाढी वारी पायी पालखी सोहळ्याची तयारी आळंदी देवस्थानकडून जोमात सुरू असून, यंदा माऊलींचे दर्शन घेण्यासाठी भक्तांना नव्याने उभारण्यात आलेली

अद्ययावत दर्शनबारीचे काम अंतिम टप्प्यात
आळंदी : संत ज्ञानेश्वरमहाराज आषाढी वारी पायी पालखी सोहळ्याची तयारी आळंदी देवस्थानकडून जोमात सुरू असून, यंदा माऊलींचे दर्शन घेण्यासाठी भक्तांना नव्याने उभारण्यात आलेली दर्शनबारी उपलब्ध होणार आहे. दर्शनबारीच्या मार्गिकेचे काम अंतिम टप्प्यात आले असून, नवीन दर्शनबारीच्या बांधकामासाठी ५ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. विकसित दर्शनबारीमुळे भक्तांची होणारी गैरसोय टळणार असून, माऊलींच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठीचा मार्ग यामुळे सुखकर होणार आहे.
महाराष्ट्राबरोबरच कर्नाटक व इतर राज्यांतून लाखोंच्या संख्येने भाविक व वारकरी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरमहाराजांच्या संजीवन समाधीचे दर्शन घेण्यासाठी आळंदीत दाखल होत असतात. यामुळे भक्तांची गर्दी लक्षात घेऊन संस्थान कमिटीला तात्पुरत्या दर्शनबारीची उभारणी करावी लागत असे. ही उभारणी खर्चिक व वेळखाऊ असल्याने त्यासाठी मोठा कर्मचारीवर्ग नेमावा लागत असे. यामुळे पंढरपूर देवस्थानच्या पार्श्वभूमीवर आळंदीतही पंढरपूरप्रमाणे अद्ययावत दर्शनबारी उभारावी, अशी मागणी भक्त व वारकरी यांच्याकडून केली जात होती. या मागणीची दखल घेऊन संत ज्ञानेश्वरमहाराज संस्थान कमिटीने पाच कोटी रुपये खर्च करून अद्ययावत दर्शनबारीचे काम हाती घेतले होते. दर्शनबारीचे नियोजन युद्धपातळीवर असून, लाखोंच्या संख्येने येणाऱ्या भक्तांना दर्शन अधिक सुखकर होईल, असा विश्वास संस्था व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर यांनी व्यक्त केला आहे.