पीएमपी भाडेवाढीचा आज अंतिम निर्णय
By Admin | Updated: December 17, 2014 05:25 IST2014-12-17T05:25:21+5:302014-12-17T05:25:21+5:30
पीएमपीच्या भाडेवाढीसंदर्भात पीएमपी प्रशासन आणि प्रवासी संघटना व सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधींचे म्हणणे ऐकून घेण्यात आले

पीएमपी भाडेवाढीचा आज अंतिम निर्णय
पुणे : पीएमपीच्या भाडेवाढीसंदर्भात पीएमपी प्रशासन आणि प्रवासी संघटना व सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधींचे म्हणणे ऐकून घेण्यात आले असून, भाडेवाढीबाबत बुधवारी अंतिम निर्णय घेण्यात येणार असल्याचे प्रादेशिक परिवहन प्राधिकरणांचे अध्यक्ष, जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी सांगितले.
पीएमपी प्रशासनाने बस भाडेवाढीचा प्रस्ताव प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाकडे पाठविला आहे. यामध्ये प्रशासनाने सध्या पीएमपीला सुमारे १६८ कोटी तोटा असून, ही तूट भरून काढण्यासाठी भाडेवाढ करणे अत्यंत आवश्यक आहे. पीएमपीचे अस्तित्व टिकविण्यासाठी पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकांनी ही रक्कम द्यावी अथवा भाडेवाढ करावी, हे दोनच पर्याय असल्याचे प्रशासनाचे मत आहे. तर प्रवासी संघटनेने दरवाढ न करता नॉन तिकीट महसूल वाढून ही तूट भरून काढावी. यामध्ये पीएमपीच्या ४२ एकर जागेचा वापर, बस स्टॉप, बसवर जाहिराती देऊन व वस्तू खरेदीत पारदर्शकता आणावी. भाडेवाढ केल्यानंतर प्रवासीसंख्या कमी होऊन अधिक तूट होईल, असे मत व्यक्त केले आहे. त्यामुळे आता प्रवासी आणि प्रशासन या दोघांची बाजू ऐकून घेण्यात आली
असून, याबाबत बुधवारी अंतिम निर्णय घेणार असल्याचे राव यांनी
सांगितले. (प्रतिनिधी)