मुंढवा जॅकवेलचा मार्ग मोकळा
By Admin | Updated: July 14, 2015 03:12 IST2015-07-14T03:12:04+5:302015-07-14T03:12:04+5:30
शहरात निर्माण होणारे शुद्ध केलेले सांडपाणी मुंढवा येथील बंधाऱ्यातून जिल्ह्यातील शेतीसाठी सोडण्यात येणार आहे. या प्रकल्पाची जलवाहिनी आपल्या शेतातून

मुंढवा जॅकवेलचा मार्ग मोकळा
पुणे : शहरात निर्माण होणारे शुद्ध केलेले सांडपाणी मुंढवा येथील बंधाऱ्यातून जिल्ह्यातील शेतीसाठी सोडण्यात येणार आहे. या प्रकल्पाची जलवाहिनी आपल्या शेतातून टाकू नये यासाठी सर्वोच्च न्यायालयात एका शेतकऱ्याने धाव घेतली होती. मात्र, या प्रकल्पाचे काम ९० टक्के पूर्ण झाले असून, हा जनहिताचा प्रकल्प असल्याचे सांगत सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने महापालिकेच्या बाजूने निकाल दिला आहे. त्यामुळे या प्रकल्पाच्या मार्गातील शेवटचा अडथळाही दूर झाला आहे.
हडपसर येथील संदीप तुपे यांनी महापालिकेच्या विरोधात याचिका दाखल केली होती. खडकवासला प्रकल्पातून शहरासाठी जादा पाणी मिळावे म्हणून पालिकेकडून शुद्ध केलेले तब्बल साडेसहा टीएमसी सांडपाणी शेतीसाठी सोडण्याचा प्रकल्प हाती घेतला आहे. तब्बल १०० कोटी खर्चून उभारण्यात आलेला हा प्रकल्प मार्चअखेरीस पूर्ण होणार होता.
महापालिकेकडून या प्रकल्पासाठी टाकलेल्या जलवाहिनीचे काम ९० टक्के पूर्ण झाले आहे. मात्र, शेवटच्या टप्प्यात एका शेतकऱ्याच्या शेतीमधून २०० मीटरची जलवाहिनी टाकण्याचे काम बाकी आहे.
त्यासाठी तुपे यांचा विरोध होता. त्यामुळे महापालिका प्रशासनाकडून तुपे यांची भेट घेऊन त्यांनी जागा देण्याबाबत विनंतीही केली होती. मात्र, त्यांचा जलवाहिनीच्या कामास विरोध असल्याने त्यांनी पालिकेविरोधात दावा दाखल केला होता. आधी सत्र न्यायालय, नंतर जिल्हा न्यायालय, नंतर उच्च न्यायालयात तुपे यांनी याचिका दाखल केली होती. मात्र, सर्व न्यायालयांनी महापालिकेच्या बाजूने निकाल दिला होता. त्यानंतर तुपे यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.
मात्र, सोमवारी पुन्हा महापालिकेच्या बाजूने निकाल लागल्याचे पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख व्ही. जी. कुलकर्णी यांनी सांगितले. दरम्यान, उच्च न्यायालयातच महापालिकेच्या बाजूने निकाल लागल्यानंतर सर्वोच्च न्यायालयात पालिकेने आधीच कॅव्हेट दाखल केलेले होते. (प्रतिनिधी)