इंदापूरमध्ये अवैध सावकारकीविरोधात गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:08 IST2021-02-05T05:08:17+5:302021-02-05T05:08:17+5:30
बारामती तालुक्यात खासगी सावकारांच्या पोलीस खात्याने मुसक्या आवळल्यानंतर वालचंदनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रणगाव येथील खासगी सावकार पंडित दगडू ...

इंदापूरमध्ये अवैध सावकारकीविरोधात गुन्हा दाखल
बारामती तालुक्यात खासगी सावकारांच्या पोलीस खात्याने
मुसक्या आवळल्यानंतर वालचंदनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रणगाव येथील खासगी सावकार पंडित दगडू रणमोडे याच्याविरोधात फिर्यादीवरुन आज खासगी सावकारीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये एका शेतकऱ्याने पंडित रणमोडे यांच्याकडून कर्जाचे हप्ते भरण्यासाठी एक लाख रुपये दरमहा पाच टक्के व्याजदराने घेतले होते. त्यापोटी पंडित रणमोडे यास या शेतकऱ्याने २ लाख ७०हजार रुपये दिले.
मात्र, शेतकऱ्याने पुन्हा रणमोडे यांच्याकडून एक लाख रुपये व्याजाने घेतले होते. त्याबदल्यात व्याज आणि मुद्दल मिळून दोन लाख २० हजार रुपये दिल्यानंतरही रणमोडे यांनी या शेतकऱ्याकडे तुमच्याकडे २ लाख रुपये बाकी आहेत. ती रक्कम द्या नाहीतर तुमची जमीन माझे नावावर कर, अशी धमकी देत होते. कोणत्याही प्रकारचा सावकारीचा परवाना नसतानासुद्धा फिर्यादी यांचेकडून व्याजाची वसुली करत होते व जमीन लिहून देण्यास तगादा लावला. त्यावरून या शेतकऱ्याने वालचंदनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. याप्रकरणाची चौकशी केल्यानंतर पोलिसांनी रणमोडे याच्याविरोधात अवैध सावकारीचा गुन्हा दाखल केला आहे.
वालचंदनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत कोणीही खासगी सावकारी करत असेल तर संबंधितांची माहिती वालचंदनगर पोलीस ठाण्यात कळवावी, पोलीस नक्कीच कारवाई करतील.
दिलीप पवार
सहायक पोलीस निरीक्षक वालचंदनगर