युवतीची मृत्यूशी झुंज

By Admin | Updated: January 17, 2015 00:16 IST2015-01-17T00:16:59+5:302015-01-17T00:16:59+5:30

छेडछाडीने त्रस्त आणि पोलिसांकडे जाऊनही योग्य दखल न घेतल्याने युवतीने गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.

Fighting the maiden's death | युवतीची मृत्यूशी झुंज

युवतीची मृत्यूशी झुंज

पिंपरी : छेडछाडीने त्रस्त आणि पोलिसांकडे जाऊनही योग्य दखल न घेतल्याने युवतीने गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. भोसरीत घडलेल्या या घटनेतील युवती मृत्यूशी झुंज देत आहे. या घटनेची गांभीर्यता लक्षात घेत पुण्याचे सह पोलीस आयुक्त संजीवकुमार यांनी या प्रकरणाच्या चौकशीसह एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या दोषी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचीही चौकशी सुरू केली आहे.
भोसरी परिसरात राहणारी ही युवती रोडरोमिओंच्या छेडछाडीमुळे त्रस्त होती. ३१ डिसेंबरला रात्री त्यांनी युवतीच्या घरी घुसून तिच्या आईला धक्काबुक्की करून युवतीशी गैरवर्तन केले. या प्रकरणाची तक्रार देण्यासाठी पोलीस चौकी व ठाण्यात गेलेल्या तिच्या कुटुंबीयांकडे पोलिसांनी सुरुवातीला दुर्लक्ष केले. नंतर केवळ अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र, या अंतर्गतदेखील त्रास देणाऱ्यांवर कसलीही कारवाई करण्यात आली नाही. पीडित युवतीच्या तक्रारीची पोलीस योग्य दखल घेत नसल्याने निराश झालेल्या युवतीने ३ जानेवारीला घरात गळफास लावून आत्महत्येचा प्रयत्न केला.
हा प्रकार लक्षात आल्यानंतर कुटुंबीयांनी तातडीने तिला भोसरीतील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. येथे तिच्यावर उपचार सुरू होते. दरम्यान, प्रकृती खालावल्याने बुधवारी रात्री तिला पिंपरी संत तुकारामनगर येथील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात दाखल करण्यात आले. येथे अतिदक्षता विभागात तिच्यावर उपचार सुरू असून, ती मृत्यूशी झुंज देत आहे.
दरम्यान, प्रकरण अंगलट येऊ लागल्याने अखेर ३ जानेवारीला एमआयडीसी पोलिसांनी बाबू नाईक, सचिन चव्हाण आणि अकीब शेख यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली.
दरम्यान, रोडरोमिओंचा छेडछाडीचा त्रास आणि पोलिसांकडून जाऊनही त्यांनी योग्य दखल न घेतल्याने मुलीने गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.(प्रतिनिधी)

Web Title: Fighting the maiden's death

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.