चाऱ्याचा प्रश्न पुन्हा गंभीर
By Admin | Updated: December 23, 2015 00:09 IST2015-12-23T00:09:37+5:302015-12-23T00:09:37+5:30
परतीच्या अवकाळी पावसाने दिलासा दिल्यामुळे मागील दोन महिन्यांत चाऱ्याचा प्रश्न काही प्रमाणात कमी झाला होता.

चाऱ्याचा प्रश्न पुन्हा गंभीर
बारामती : परतीच्या अवकाळी पावसाने दिलासा दिल्यामुळे मागील दोन महिन्यांत चाऱ्याचा प्रश्न काही प्रमाणात कमी झाला होता. मात्र, आता पुन्हा चाऱ्याचा प्रश्न भेडसावू लागला आहे. यापूर्वीच जनावरांसाठी चारा डेपोसाठी बारामती तहसीलदारांकडून अहवाल शासनाला पाठविण्यात आला होता. त्यामध्ये तब्बल
३२ गावांचा समावेश आहे. साधारणत: जानेवारी, फेब्रुवारीमध्ये हा प्रश्न पुन्हा ऐरणीवर येईल. त्यादृष्टीने तयारी प्रशासनाने केली आहे, अशी माहिती तहसीलदार नीलप्रसाद चव्हाण यांनी दिली.
बारामती तालुक्याचा पश्चिम पट्ट्यात पाण्याचे दुर्भिक्ष्य दिवसेंदिवस वाढतच असल्याने दुष्काळाचे सावट अधिक गडद होत आहे. त्यातच
आता तब्बल लाखभर पशुधनासाठी
या जनावरांना खाण्यासाठी चारा आणि पिण्यासाठी पाणी मिळणेही दिवसेंदिवस जिकिरीचे बनत चालले आहे.
मध्यंतरी अवकाळी पावसामुळे काही प्रमाणात चारा पिके तरली. त्यामुळे दोन महिने जनावरांना चारा पुरला. आता परिस्थिती बदलत आहे.
यापूर्वी बारामती तालुक्यातील प्रमुख चार महसुली गावांमधील तब्बल ३२ वाड्या-वस्त्यांवर जनावरांसाठी चारा आणि पाणीच नसल्याने तत्काळ चारा डेपो
सुरू करण्याची मागणी
तहसील कार्यालयाकडून जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.
बारामती तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील उंडवडी, सुपे, सुपा, मोरगाव, लोणी भापकर या मंडल गावांच्या परिसरातील सुमारे ३२ गावे, तसेच वाड्या-वस्त्यांवर पाण्याची तसेच चाऱ्याची प्रचंड टंचाई आहे.
या गावांमध्ये लहान ४९ हजार ५५८, तर मोठी २५ हजार १३८ जनावरे आहेत. या जनावरांसाठी दररोज
सुमारे १० हजार क्विंटल चाऱ्याची आवश्यकता आहे. त्यानुसार,
तीस हजार क्विंटल चाऱ्याची आवश्यकता आहे.
पण प्रत्यक्षात तीन-चार हजार क्विंटल चाराच या जनावरांसाठी उपलब्ध आहे. त्यामुळे या
मंडल गावांकडून चारा डेपो सुरू करण्याची मागणी करण्यात आली असून त्यानुसार तहसील कार्यालयाकडून जिल्हा प्रशासनास प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. (प्रतिनिधी)
जलयुक्तने तारले...
दुष्काळी पट्ट्यात असलेल्या या गावांमध्ये दरवर्षी काही प्रमाणात का होईना, पण पाऊस झाल्याने चाऱ्याची समस्या सुटते. मात्र, या वर्षी आॅगस्ट संपला तरी दरवर्षीच्या सरासरीच्या अवघा २८६ मिमी पाऊस पडला आहे. त्यात दुष्काळी पट्ट्यात कमी पाऊस झाला आहे. परतीच्या अवकाळी पावसाने दुष्काळी गावांना तारले. त्यातच जलयुक्त शिवार योजनेमुळे पावसाचे पाणी भूगर्भात जिरविणे शक्य झाले. त्यामुळे विहीर, कूपनलिकांच्या पाण्याची पातळी वाढली. आता ही परिस्थितीदेखील बदलत आहे. पाण्याच्या टँकरबरोबरच जनावरांसाठी चारा छावण्या सुरू करण्याची मागणी जोर धरू
लागली आहे.