गणेशोत्सवात वाढला ‘ती’चा सहभाग

By Admin | Updated: September 29, 2015 02:09 IST2015-09-29T02:09:29+5:302015-09-29T02:09:29+5:30

गणेशोत्सवात ‘ती’ची आघाडी सरस ठरली. पुरुषांच्या तोडीस तोड महिलांच्या उत्स्फुर्त सहभागाने गणेशोत्सव अजरामर ठरविला.

The festival of Ganesh festival was increased | गणेशोत्सवात वाढला ‘ती’चा सहभाग

गणेशोत्सवात वाढला ‘ती’चा सहभाग

पिंपरी : गणेशोत्सवात ‘ती’ची आघाडी सरस ठरली. पुरुषांच्या तोडीस तोड महिलांच्या उत्स्फुर्त सहभागाने गणेशोत्सव अजरामर ठरविला. गणेशाच्या स्थापनेपासून ते विसर्जन मिरवणुकीपर्यंत ‘ती’चीच आघाडी होती. मिरवणुकीत ढोल वाजविण्यापासून ते विसर्जनापर्यंत ‘ती’चा सहभाग वाढलेला दिसला.
दहा दिवसांच्या गणेशोत्सवामध्ये महिला खास आकर्षण ठरल्या. पारंपरिक नृत्य करण्यापासून ते विसर्जनादरम्यान ‘मोरया’चा गजर करण्यातही ‘ती’च पुढे होती. कुटुंबाच्या सुरक्षितेबरोबरच जनतेच्या सुरक्षेसाठी‘ती’ने पहाटेपर्यंत मिरवणुकीच्या गर्दीला तोंड दिले. ढोल-ताशाच्या आवाजाने महिलांनी चारही दिशा गाजविल्या. विसर्जन मिरवणुकीचा झेंडा मिरविण्यासाठीही महिलांचाच सहभाग होता. पोवाडा गाण्यातही महिलांनी किताब पटकविला. पारंपरिक वेशभूषा परिधान करून हजारोंमध्ये नृत्य करण्यातही महिला मागे राहिल्या नाहीत. लावणी असो की, डॉल्बी; नृत्य करण्यातही महिलाच पुढे होत्या. आरोग्याच्या दृष्टीने घाटावरील स्वच्छता ते निर्माल्य जमा करण्यापर्यंत महिलांनी उल्लेखनीय काम केले. ढोल-ताशा महासंघात रात्री १२ पर्यंत मिरवणूक आकर्षक करण्यातही ‘ती’चा सहभाग गतवर्षीच्या तुलनेमध्ये या वर्षी वाढलेला दिसून आला आहे.
स्वयंसेवी महिलांसमवेत पोलीस महिलांनीही अलोट गर्दीच्या समूहाला पेलण्याचे काम केले. घरची मिरवणूक सोडून नागरिकांच्या गर्दीला तोंड देण्याचे आवाहन त्यांनी पेलले. ढोल-ताशा पथकातही घाम गळेपर्यंत महिलांनी ढोल व ताशा वाजविला. झाशीची राणी, सावित्रीबाई फुले यांचा संदेश समाजापर्यंत महिलांनी गणेशोत्सवाच्या माध्यमातून दिला. अनेक पथनाट्येही या वर्षी महिलांनी सादर केली.
गणेशोत्सवात महिलांचा उत्साह चेहऱ्यावरून ओसंडून वाहत होता. शहरभरात ठिकठिकाणी जाऊन गणेश मंडळांपुढे जाऊन पोवाडाही गायला. पोलीस मित्र म्हणून विसर्जनात गर्दीचे आव्हान पेलले. यामध्ये सफाई कर्मचारी महिलांचेही तेवढेच योगदान राहिले. एकविसाव्या शतकात हे चित्र मात्र बदललेले दिसले. टिळकांचा सार्वजनिक गणेशोत्सव आज सार्थक ठरला, असे म्हणण्यात वावगे ठरणार नाही. मंडळाचे अध्यक्षपदही महिलांनी गाजवले. वर्गणी जमा करण्यापासून ते मंडळाची देखभाल, सजावट, विविध स्पर्धांमध्ये ‘ती’चा सहभाग उत्स्फूर्त राहिला. (प्रतिनिधी)
---
जिल्ह्यात नव्हे, तर महाराष्ट्रात आमचे पोवाडा पथक पोहोचले आहे. महिलांनी एकत्रित येऊन पोवाडा गाणे व समाजप्रबोधन करणे हे आव्हानात्मक आहे. पोवाड्याच्या माध्यमातून स्त्री सबलीकरण व स्त्री भ्रूणहत्येचे काम केले. ‘लोकमत’ने राबविलेल्या ‘ती’च्या गणपतीची संकल्पना ही अतुलनीय आहे. महिला कोणत्याही क्षेत्रात मागे राहिल्या नाहीत, हे गणेशोत्सवाच्या माध्यमातून दिसून आले आहे.
- शीतल कापशीकर,
संजीवनी शाहिरी पथक, प्राधिकरण
----
दर वर्षीप्रमाणेच गणेश विसर्जनाला अलोट गर्दी होती. जनसमुदाय आवरणे कठीण होते. कुटुंबाला वेळ देता येत नाही. मात्र, विसर्जनाच्या मिरवणुकीची पहाटे तीनपर्यंत ड्युटी करावी लागते. पहिल्यासारखे आता राहिले नाही. पुरुषांप्रमाणेच महिलांना ड्युटी दिली जाते. दोन वर्षांपासून मी विसर्जन मिरवणुकीची रात्रपाळी करीत आहे. वेगवेगळे अनुभव यादरम्यान येतात. मात्र, कर्तव्य पार पाडायचे ठाम असते.
- ज्योत्स्ना पाटील,
पोलीस उपनिरीक्षक, सांगवी

Web Title: The festival of Ganesh festival was increased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.