कोरोनाच्या वाढत्या प्रसाराची एसटीला धास्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:16 IST2021-02-23T04:16:14+5:302021-02-23T04:16:14+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे: कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येची एसटी महामंडळाला धास्ती बसली आहे. प्रवासी संख्या व उत्पन्नावर सध्या फारसा परिणाम ...

कोरोनाच्या वाढत्या प्रसाराची एसटीला धास्ती
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे: कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येची एसटी महामंडळाला धास्ती बसली आहे. प्रवासी संख्या व उत्पन्नावर सध्या फारसा परिणाम झाला नसला, तरी पुन्हा टाळेबंदी आली, तर आर्थिक घडी विस्कटण्याची भीती प्रशासनाला सतावते आहे.
कोरोनाआधी जिल्ह्यात एसटी महामंडळाचे रोजचे प्रवासी २ लाखांपेक्षा जास्त होते व उत्पन्नही रोज सव्वा कोटी रुपयांच्या आसपास व्हायचे. कोरोना टाळेबंदीत ते सगळे थांबले. आता अनलॉकनंतर नुकतेच कुठे मार्गावर येत होते. सध्या एसटीला जिल्ह्यात रोज १ लाख २ ते ३ हजार प्रवासी आहेत व उत्पन्न ९० लाख रुपयांपर्यंत आहे.
टाळेबंदी संपल्यानंतर लगेचच एसटीला पूर्वीची सरासरी गाठता आलेली नाही. मात्र, सलग जोडून आलेल्या सुट्या व सुरू केलेल्या विशेष पर्यटन गाड्या यामुळे उत्पन्न काहीसे सुरळीत होत होते. त्याला आता पुन्हा आळा बसेल की काय, अशी शंका प्रशासनाला भेडसावते आहे. शाळा, महाविद्यालये सुरू झाली, तर उत्पन्न वाढेल अशी आशा होती, मात्र आता ते पुन्हा बंद झाल्यामुळे विद्यार्थ्यांच्या प्रवासी पासचे जिल्ह्याचे मोठे उत्पन्न बुडाले आहे. त्याचबरोबर लग्नसमारंभाला उपस्थितीची मर्यादा, देवळे वगैरे पुन्हा बंद केली तर त्याचीही संक्रांत येईल असे प्रशासनाला वाटते आहे.
एसटी गाडयांची जिल्ह्यातील संख्या- ८५०
कोरोनोआधीचे किलोमीटर ३ लाख
सध्याचे किलोमीटर- २ लाख ७० हजार
कोरोना आधीची जिल्ह्यातील प्रवासी संख्या- २ ते अडीच लाख
लॉकडाऊन खुला केल्यानंतरची संख्या - १ लाख ३ हजार
सध्याची संख्या - १ लाख ३ हजार
-- टाळेबंदी संपल्यानंतर जिल्ह्यातील एसटीच्या सर्व फेऱ्या आता सुरू झाल्या आहेत. प्रत्येत तालुक्यात गाडी जाते. पूर्वी जात होती त्या गावांमध्येही एसटीची फेरी सुरू करण्यात आली आहे.
-- शाळा, महाविद्यालये बंद असल्यामुळे त्यांच्यासाठीच्या गाड्या मात्र बंद आहेत. पासचे जिल्ह्याला दरमहा १ कोटी रुपयांचे उत्पन्न होते, ते बंद झाले आहे.
-- ना मास्क-ना डिस्टन्सिंग
शहरात महामंडळाची स्वारगेट, पुणे रेल्वे स्टेशन व शिवाजीनगर (वाकडेवाडी) अशी तीन स्थानके आहेत. त्यापैकी एकाही स्थानकावर कोरोनासाठीचे सुरक्षेचे नियम पाळले जात नाहीत. महामंडळाच्या चालक- वाहक कर्मचाऱ्यांपासून ते प्रवाशांपर्यंत मास्क नसतातच व असले तरीही ते व्यवस्थित लावलेले नसतात. सॅनिटायझर स्वच्छता तर नावालाही दिसत नाही.