एफसी रोड ते जेएम रोड स्काय वॉक
By Admin | Updated: March 12, 2017 03:28 IST2017-03-12T03:28:45+5:302017-03-12T03:28:45+5:30
फर्ग्युसन रस्ता ते थेट जंगलीमहाराज रस्ता व तिथून मेट्रो असा एक स्काय वॉक तयार करण्याचा प्रस्ताव महामेट्रो कंपनीने पुणे मेट्रो अंतर्गत तयार केला आहे. तो प्रत्यक्षात आला

एफसी रोड ते जेएम रोड स्काय वॉक
पुणे : फर्ग्युसन रस्ता ते थेट जंगलीमहाराज रस्ता व तिथून मेट्रो असा एक स्काय वॉक तयार करण्याचा प्रस्ताव महामेट्रो कंपनीने पुणे मेट्रो अंतर्गत तयार केला आहे. तो प्रत्यक्षात आला तर फर्ग्युसन रस्त्यावरील मेट्रो प्रवाशांना थेट नदीपात्रातील मेट्रो स्थानकाकडे जाणे शक्य होणार आहे. याशिवाय पुणे मेट्रोच्या वनाज, शिवाजीनगर गोडाऊन व कल्याणीनगर यापैकी एका ठिकाणी मेट्रो सिटी असाही एक प्रकल्प राबवण्याचा कंपनीचा विचार आहे.
कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांनी ही माहिती दिली. जंगलीमहाराज रस्त्यावरचा मेट्रोचा मार्ग बदलून तो नदीपात्रातून नेण्यात आला आहे. तसेच फर्ग्युसन रस्त्याशी मेट्रोचा थेट संबंध येत नाही. मेट्रो प्रकल्पाची यशस्विता त्याचा किती लोकसंख्येकडून वापर होतो यावर अवलंबून आहे. त्यामुळेच जास्तीजास्त प्रवासी जोडून घेण्यासाठी म्हणून कंपनीकडून विविध उपक्रम राबवले जात आहेत. नियोजित स्काय वॉक हा त्याचाच एक भाग आहे.
फर्ग्युसन रस्त्यावरचा युवावर्ग हा मेट्रोच्या प्रवाशांमधील मोठा घटक असणार आहे. तो बाजूला राहिला तर योग्य नाही या विचाराने या भल्या मोठ्या स्काय वॉकचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे, असे दीक्षित म्हणाले. फर्ग्युसन रस्त्यावरून तो थेट जंगलीमहाराज रस्त्यावर व तिथून नदीपात्रात आणला जाईल. सध्याच्या रस्त्यांच्या तो बऱ्याच उंचीवरून असेल. अत्यंत आधुनिक अशा केबल तंत्राने तो तयार केला जाईल. त्याची मजबुती, सुरक्षा याची काळजी तर घेतली जाईलच, शिवाय त्यावर जाणे व उतरणे सोपे करण्यासाठी लिफ्ट सारखे तंत्रज्ञानही वापरण्यात येणार आहे. फर्ग्युसन रस्ता किंवा जंगली महाराज रस्त्यावरील कोणाला मेट्रोचा वापर करायचा असेल तर ते अगदी सहजपणे, मूळ रस्त्यावरची गर्दी टाळून या स्काय वॉकने थेट मेट्रो स्टेशनजवळ येऊ शकतील, असे दीक्षित म्हणाले.
(प्रतिनिधी)
- सध्या जरी हा प्रस्ताव फक्त आॅनपेपर असला तरीही त्यावर अनेक तज्ज्ञ काम करीत आहेत. त्याची उपयुक्तता लक्षात घेऊन तो प्रत्यक्षात यावा यासाठी त्यातील सर्व अडचणी दूर करण्याची कंपनीची तयारी आहे. त्यामुळे सध्या त्यावर काम सुरू आहे. मेट्रोचे काम सुरू होईल त्याच वेळी हेही काम सुरू करण्याचा कंपनीचा विचार आहे. त्यासाठीची आर्थिक तयारीही कंपनी वेगवेगळ्या मार्गाने करेल. देशात कुठेही अशा प्रकारचा स्काय वॉक नाही असा दावा दीक्षित यांनी केला.
- मेट्रो सिटी ही कल्पनाही खास मेट्रो साठीच काढण्यात आली आहे. नागपूर येथे ती वापरण्यात येणार आहे. यात परवडणारी घरे मेट्रो स्थानक किंवा डेपो यांच्या आसपास उपलब्ध करून दिली जाणार आहेत. जागा उपलब्ध असेल त्याप्रमाणे साधारण ५ ते १० हजार सदनिका यात बांधल्या जातील.
- मेट्रोला तिकिटाच्या दरातून फारसे उत्पन्न मिळणार नाही. अधिक उत्पन्नासाठीची ही तरतूद आहे, त्याचबरोबर यातून मेट्रोचा वापर करणारे प्रवासीही वाढणार आहेत. हेही काम मेट्रोचे काम सुरू असतानाच केले जाईल. अशी ‘मेट्रो सिटी’ ही संकल्पनाही महामेट्रो कंपनीकडून प्रथमच वापरण्यात येत आहे. त्याचा चांगला उपयोग होईल, असा विश्वास दीक्षित यांनी व्यक्त केला.