मुलांसमोरच वडिलांचा खून
By Admin | Updated: August 21, 2015 02:39 IST2015-08-21T02:39:24+5:302015-08-21T02:39:24+5:30
चाळिशीतील तरुणाचा त्याच्या मुलांसमोरच लाकडी फळी आणि स्टंपने डोक्यात घाव घालून निर्घृणपणे खून करण्यात आला. बुधवारी रात्री साडेनऊच्या सुमारास ही घटना घडली.

मुलांसमोरच वडिलांचा खून
राजगुरुनगर : चाळिशीतील तरुणाचा त्याच्या मुलांसमोरच लाकडी फळी आणि स्टंपने डोक्यात घाव घालून निर्घृणपणे खून करण्यात आला. बुधवारी रात्री साडेनऊच्या सुमारास ही घटना घडली.
आनंद सुदाम काशीद (वय ४०, रा. गायत्री अपार्टमेंट, सदनिका क्र. ७, ब्राह्मणआळी, राजगुरुनगर) असे या घटनेत मृत्यू झालेल्याचे नाव आहे. तो विटा, वाळू पुरविण्याचा आणि चायनिज खाद्यपदार्थांची गाडी चालविण्याचा व्यवसाय करीत होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आनंद काशीद यांचा मुलगा मनीष ( वय १४) याने याबाबत फिर्याद दिली आहे. काशीद यांच्याकडे काम करणाऱ्या महिलेच्या मुलीचा वाढदिवस बुधवारी होता. त्यासाठी काशीद आणि त्यांचा मुलगा मनीष व मुलगी श्वेता आपल्या राहत्या घरातून निघाले होते. ते तिघे जिन्यावरून उतरत असताना त्यांच्याच इमारतीत राहणारा अविनाश ऊर्फ दाद्या अशोक तळेकर, माऊली बाजारे (रा. कुंभारवाडा, राजगुरुनगर) आणि गणेश (पूर्ण नाव माहीत नाही) या तिघांनी आनंद काशीद यांना अडविले आणि गचांडी पकडून शिवीगाळ सुरू केली. त्यानंतर लगेच अविनाश तळेकर याने त्याच्या हातातल्या लाकडी फळीने आनंदच्या डोक्यात फटके मारले. दुसऱ्या दोघांनी हातातल्या स्टंपने मारहाण केली. मुलगी श्वेता हिने आरडओरड केल्याने शेजारीपाजारी जमा झाले. तरीही त्याला कोणी वाचवू शकले नाही. मारहाणीमुळे गंभीर दुखापत झाल्याने आनंद जिन्यावरच गतप्राण झाले.
पोलिसांनी तिन्ही आरोपींवर भा.दं.वि. कलम ३०२ आणि ३४ द्वारे खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. खुनाचे कारण समजू शकले नाही. सहायक फौजदार ए. टी. शिंदे अधिक तपास करीत आहेत. (वार्ताहर)