- अंकिता कोठारे
पुणे : नात्यांना शब्दांची गरज नसते... आणि प्रेमाला मोजमाप नसतं. मुलगा आपल्या वडिलांसाठी काय करू शकतो, याचे हृदयस्पर्शी उदाहरण पुण्यात समोर आले आहे. वयाच्या २१ व्या वर्षी एका मुलाने वडिलांचे प्राण वाचवण्यासाठी स्वतःच्या शरीरातील ७० टक्के यकृत (लिव्हर) दान केले आहे. ही केवळ वैद्यकीय घटना नव्हे तर प्रेम, निःस्वार्थ, त्याग आणि रक्ताच्या नात्यांपलीकडच्या माणुसकीची आदर्श आहे.
२१ व्या वर्षी चैतन्य पठारे याच्या वडिलांना अचानक जीवघेणा लिव्हर सोयरासिसचा त्रास जाणवू लागला. तपासण्या केल्यानंतर डॉक्टरांनी सांगितले की, तत्काळ लिव्हर ट्रान्सप्लांट केले नाही, तर जीव धोक्यात येऊ शकतो. हे ऐकून संपूर्ण कुटुंब कोसळले. अनेक चाचण्या, प्रयत्नांनंतर योग्य डोनर न मिळाल्याने घरातील वातावरणात चिंतेचे मळभ दाटले.
सर्वत्र डोनर शोधले गेले. रक्तगट, आरोग्य निकष यामुळे पर्याय कमीच मिळत होते. दरम्यान, चैतन्यने स्वतः पुढाकार घेत डॉक्टरांकडे चाचण्या केल्या. सर्व चाचण्या योग्य आल्या आणि तो डोनर होऊ शकतो हे स्पष्ट झाले. घरच्यांनी सुरुवातीला त्याच्या निर्णयाला विरोध केला. आई म्हणाली, 'तू अजून लहान आहेस, तूच जर आजारी पडलास तर? पण चैतन्यचा निर्धार ढळला नाही. वडिलांनी लहानपणापासून प्रत्येक गोष्ट शिकवली. चालायला शिकवले, घसरलो तेव्हा धरले. आज त्यांना आधाराची गरज आहे. आता मी त्यांच्यासाठी काहीच केले नाही, तर काय उपयोग या नात्याचा? अशा शब्दांनी त्याने सर्वांना भावुक केले.
वयाच्या अवघ्या २१ व्या वर्षी असा निर्णय घेणे सोपे नव्हते. पण, चैतन्यच्या निर्धारासमोर कोणतीही अडचण टिकली नाही. डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली आणि वैद्यकीय कसोटीवर खरे उतरत त्याने ७० टक्के यकृत दान केले. यशस्वी शस्त्रक्रियेनंतर वडिलांची प्रकृती सुधारली असल्याचे चैतन्यने सांगतिले.