सासरा ‘क्लास फोर’ कर्मचारी, पेन्शन ३०० रुपये तरी मालमत्ता कोट्यवधींची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:12 IST2021-04-01T04:12:38+5:302021-04-01T04:12:38+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : हनुमंत नाझीरकर याचे सासरे हे १९८७ मध्ये वर्ग ४ चे कर्मचारी म्हणून निवृत्त झाले. ...

Father-in-law ‘Class Four’ employee, pension Rs 300 but assets worth crores | सासरा ‘क्लास फोर’ कर्मचारी, पेन्शन ३०० रुपये तरी मालमत्ता कोट्यवधींची

सासरा ‘क्लास फोर’ कर्मचारी, पेन्शन ३०० रुपये तरी मालमत्ता कोट्यवधींची

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : हनुमंत नाझीरकर याचे सासरे हे १९८७ मध्ये वर्ग ४ चे कर्मचारी म्हणून निवृत्त झाले. त्यावेळी त्यांना पेन्शन ३०० रुपये होते. असे असताना त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी मालमत्ता खरेदी केल्या. तसेच ३७ भागीदारी तसेच खासगी कंपन्या स्थापन केल्या. नाझीरकर कुटुंबियांचे नावे ३७ भागीदारी तसेच खासगी कंपन्या आढळून आल्या. त्यातील गुंतवणूक व नफा वगळून ही बेकायदा मालमत्ता आढळून आली, असे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या तपासातून निष्पन्न झाले आहे.

सासरे गुलाब धावडे यांचे निधन झाल्यानंतर नाझीरकरने त्यांचे मृत्युपत्र तयार करुन ती सर्व मालमत्ता पत्नी संगिता नाझीरकर हिच्या नावे वर्ग केल्याचे आढळून आले. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने हे मृत्युपत्र राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे तपासणीसाठी दिले होते. हस्ताक्षर तज्ञांकडील अहवालावरुन हे मृत्युपत्र बनावट व खोटे असल्याचे निष्पन्न झाले. हनुमंत नाझीरकर याने एकाच क्रमांकाचे ३ बनावट नोटराईज मृत्युपत्र तयार केले असून त्यापैकी १ मुळ मृत्युपत्र जप्त करण्यात आले आहे. मृत्युपत्रावर नोटरी म्हणून सही व शिक्का असलेले नोटरी अ‍ॅड. विजय धुमाळ यांच्याकडे तपास करता त्यांनी नोटराईज मृत्युपत्रातील शिक्के व सह्या या त्यांच्या नसून बनावट असल्याचे तपासात सांगितले आहे.

नाझीरकरने त्याचे सासरे गुलाब धावडे व पत्नी संगिता यांच्या नावे स्थावर मालमत्ता खरेदी करताना, बँक व्यवहारात तसेच विविध कंपन्यांमध्ये गुंतवणुक करताना कोट्यवधी रुपये रोख स्वरुपात गुंतविले आहेत. हवाला मार्गे पैशांचा वापर झाला अगर कसे याचा तपास यंत्रणेला करायचा आहे.

नाझीरकरने अवैध मार्गाने कमाविलेल्या पैशातून सासरे धावडे याचे नावाने ३५ स्थावर मालमत्ता खरेदी केल्याचे तपासादरम्यान निष्पन्न झाले आहे. हनुमंत नाझीरकर व संगीता यांनी वैयक्तिकरित्या १७ स्थावर मालमत्ता खरेदी केल्या आहेत. अशा एकूण ५२ स्थावर मालमत्तांचे मुळ खरेदीखत आरोपीकडून हस्तगत करायचे आहे. या मालमत्ता खरेदी करताना मोठ्या स्वरुपात रोख रक्कमेचा वापर झालेला आहे.

नाझीरकर याने महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी स्वत: पैसे देऊन इतरांचे नावाने अवैधरित्या मालमत्ता खरेदी केल्याचे तपासादरम्यान दिसून येत आहे. त्याचा अधिक तपास करायचा आहे. नाझीरकर कुटुंबियाचे नावे असलेल्या ३७ कंपन्यांचे कामकाज व आर्थिक व्यवहार हनुमंत नाझीरकर स्वत: पाहात होता, असे कंपनीतील भागीदारांचे म्हणणे आहे. नाझीरकरला पाचवेळा तपासाकामी हजर राहण्याबाबत कळविले होते, तरीही त्याने तपासात सहकार्य केले नाही, असे सांगून सरकारी वकील राजेश कावेडिया यांनी पोलीस कोठडीची विनंती केली. न्यायालयाने ती ग्राह्य धरुन नाझीरकर याला ७ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. पोलीस निरीक्षक गिरीश सोनवणे अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Father-in-law ‘Class Four’ employee, pension Rs 300 but assets worth crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.