चोराच्या वडिलांनीच केले दागिने परत
By Admin | Updated: July 10, 2015 11:39 IST2015-07-10T02:37:44+5:302015-07-10T11:39:02+5:30
अखिल मंडई मंडळाच्या शारदा गजाननाच्या मूर्तीवरील आभूषणे लंपास करणा-या आरोपीच्या वडिलांनी घरात लपवलेले काही दागिने पोलिसांना परत केले.
_ns.jpg)
चोराच्या वडिलांनीच केले दागिने परत
पुणे : अखिल मंडई मंडळाच्या शारदा गजाननाच्या मूर्तीवरील आभूषणे लंपास करून पसार झालेल्या आरोपीने घरामध्ये ठेवलेले काही दागिने जसेच्या तसे त्याच्या वडिलांनी स्वत:हून कोथरूड पोलीस ठाण्यात जमा केले.
आपल्या मुलाला या प्रकरणी अटक होणार, हे माहिती असूनही नारायण कुडले (वय ६०) यांनी दाखवलेला प्रामाणिकपणा बघून पोलीसही आश्चर्यचकित झाले. परिमंडल एकचे उपायुक्त तुषार दोषी यांनी त्यांचे आभार मानले.
तानाजी नारायण कुडले (वय ३५) असे आरोपीचे नाव आहे. नारायण कुडले गेली ३५ वर्षे पुण्यामध्ये रिक्षा चालवण्याचा व्यवसाय करतात. त्यांना तानाजी हा एकुलता एक मुलगा आहे. त्याचे लग्न झालेले असून त्याला चार अपत्ये आहेत. हे सर्व जण शास्त्रीनगरमधील घरामध्ये एकत्रच राहतात. तानाजी पूर्वी न्यायालयामध्ये मिळेल ती कामे करीत होता. त्याला लागलेल्या वाईट संगतीमुळे विविध प्रकारची व्यसने जडल्याचे कुडले यांनी सांगितले.
बुधवारी दिवसभर रिक्षा चालवून थकलेले कुडले घरामध्ये बसलेले होते. मद्यधुंद अवस्थेत तानाजी रात्री अकराच्या सुमारास घरी आला. मळलेले कपडे आणि अंगावर सोन्याचे दागिने असा त्याचा अवतार होता. झिंगलेल्या तानाजीला त्यांनी खोलीमध्ये नेले. दागिने कुठून आणलेस, अशी विचारणा केल्यावर त्याने चोरी केल्याचे सांगितले. त्याला सकाळी पोलिसांच्या ताब्यात द्यायचा विचार करून त्याला झोपवल्यावर त्यांनी खोलीला बाहेरून कुलूप लावून घेतले. गुरुवारी सकाळी त्याला उठवल्यानंतर चहा दिला. कुडले अंघोळीला गेल्याची संधी साधत तानाजी हाती लागतील तेवढे दागिने घेऊन घरामधून पसार झाला.
त्यांनी त्याचा आसपासच्या परिसरात शोध घेतला; परंतु तो सापडला नाही. त्याच्या खोलीमध्ये सोन्याचे दोन हार त्यांना दिसले. हे दोन्हीही हार घेऊन रिक्षाचालकाचा खाकी गणवेश अंगावर घातलेले कुडले कोथरूड पोलीस ठाण्यात पोचले. ठाणे अंमलदाराला त्यांनी चोरीचे दागिने घेऊन आल्याचे सांगितले. त्यांनी वरिष्ठ निरीक्षक नितीन भोसले पाटील यांना ही माहिती दिली. भोसले पाटील यांनी त्यांच्याकडे चौकशी केली. तातडीने तानाजीचा फोटो मागवून घेतल्यानंतर सीसीटीव्हीतील फुटेजशी तंतोतंत चेहरा मिळत होता. ही माहिती समजताच परिमंडल एकचे उपायुक्त तुषार दोषी कोथरूड पोलीस ठाण्यात दाखल झाले. त्यांनी मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात यांना बोलावून घेतले. थोरात यांनी दागिने मंडळाचेच असल्याचे सांगितल्यावर पोलिसांनी पंचनामा करून दागिने ताब्यात घेतले.
माझा मुलगा वाईट संगतीमुळे बिघडला. त्याला अनेकदा समजावले; परंतु व्यसनाधीनतेमुळे तो नियंत्रणाबाहेर गेला आहे. त्याची पत्नी धुण्या-भांड्याची कामे करते. त्याला दोन मुली आणि दोन मुले आहेत. तीन मुले शाळेमध्ये जातात. आमची परिस्थिती हलाखीची आहे. मला झेपतेय तोवर मी रिक्षा चालवून हे कुटुंब जगवेन; परंतु चोरीची आणि बेईमानीची एक पै आम्हाला नको.
- नारायण कुडले (रिक्षाचालक)
आरोपीच्या वडिलांनी दाखवलेला प्रामाणिकपणा कौतुकास्पद आहे. पुणे पोलिसांच्या वतीने त्यांचा वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत विशेष सत्कार करण्यात येणार आहे. आरोपी तानाजी सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे. त्याच्यावर उपचार सुरू आहेत. अन्य दागिन्यांचा तपास करण्यात येत आहे.
- तुषार दोषी, उपायुक्त, परिमंडल एक